Breaking

तीन मुली झाल्या म्हणून छळ; विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

Updated: मार्च 11, 2026

By Vivek Sindhu

तीन मुली झाल्या म्हणून छळ; विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: तालुक्यातील म्हाळसापूर येथे एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भक्ती अमोल कोरडे असे मृत विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत भक्तीला तीन मुली झाल्या होत्या, याच कारणावरून तिचा गेल्या अडीच वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. नवऱ्याला दुसरे लग्न करण्यासाठी संमती द्यावी, यासाठी तिला वारंवार मारहाण करून एका बाँड पेपरवर लिहून देण्याची सक्ती केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या छळाला कंटाळून भक्तीने २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी राहत्या घरी विष प्राशन केले होते. तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिला पुन्हा सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान ६ मार्च २०२६ रोजी तिची प्राणज्योत मालवली. भक्तीची आई गंगुबाई प्रभू ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल अर्जुन कोरडे, अर्जुन साधू कोरडे आणि आशाबाई अर्जुन कोरडे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ११५(२), ३(५) आणि ८५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन घोलवाल करत आहेत.


Categories

Recent Posts