Breaking

पुण्यातील वाघोलीतून अल्पवयीन मुलीची सुटका; बीड एएचटीयू पथकाची थरारक कामगिरी

Updated: मार्च 11, 2026

By Vivek Sindhu

बीड एएचटीयू पथकाची थरारक कामगिरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) अत्यंत कौशल्याने तपास करत वाघोली, पुणे येथून एका अल्पवयीन पीडित मुलीची सुटका केली असून या प्रकरणातील आरोपीला पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अपहरण आणि इतर गंभीर गुन्ह्यातील हा आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बीड पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव आणि त्यांच्या पथकाने सुरुवातीला कर्नाटक आणि छत्रपती संभाजीनगर येथे शोध घेतला होता, मात्र तिथे यश आले नाही. अखेर आरोपी आणि पीडिता पुण्यातील वाघोली परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पथक ९ मार्च रोजी पुण्याला रवाना झाले. १० मार्च रोजी सकाळी आरोपी त्याच्या कंपनीतून बाहेर पडला असता, पोलीस हवालदार प्रदीप येवले आणि अशोक शिंदे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दुचाकीवरून सुमारे पाच किलोमीटर त्याचा थरारक पाठलाग केला. आरोपी एका बँकेत शिरल्यानंतर पोलिसांनी तिथेच त्याला अत्यंत शिताफीने पकडले. त्यानंतर आरोपीने दिलेल्या माहितीनुसार वाघोलीतील भाडाळे वस्ती येथून पीडित मुलीची सुटका करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, मीरा रेडेकर, प्रदीप येवले, अशोक शिंदे, उषा चौरे, हेमा वाघमारे आणि भाऊसाहेब कारले यांच्या पथकाने पूर्ण केली. सुटका केलेली पीडिता आणि आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी माजलगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


Categories

Recent Posts