Breaking

जिद्द आणि चिकाटीचा विजय: ११ व्या वर्षी सासरने नाकारलेल्या यमुनाबाईंची ४० लाखांची उलाढाल!

Updated: मार्च 11, 2026

By Vivek Sindhu

जिद्द आणि चिकाटीचा विजय: ११ व्या वर्षी सासरने नाकारलेल्या यमुनाबाईंची ४० लाखांची उलाढाल!

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड (प्रतिनिधी): आयुष्याच्या वळणावर आलेल्या भीषण संकटांना संधीत रूपांतरित करणारी जिद्द कशी असावी, याचे जिवंत उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील यमुनाबाई जनार्धन सोनवणे. कोणतंही शालेय शिक्षण नाही, पाठीशी कोणाचं पाठबळ नाही, तरीही आज त्या ‘जीवन ज्योती’ ब्रँडच्या माध्यमातून वार्षिक ४० लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.

मूळच्या गाडे पिंपळगाव (ता. परळी) येथील यमुनाबाईंचे लग्न बालवयातच झाले. मात्र, पती मनोरुग्ण असल्याने सासरच्यांनी त्यांना वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी अंबाजोगाई येथील आश्रमात आणून सोडले. शिक्षणाऐवजी त्यांच्या पदरी संघर्षाची गाठ पडली. आश्रमात राहताना वृद्धांसाठी जेवणासोबत लागणारा ‘आंब्याचा खार’ बनवता बनवता त्यांना लोणचे बनवण्याचे तंत्र अवगत झाले. हाच त्यांच्या उद्योगाचा पाया ठरला.
१९९९ मध्ये त्यांनी दगडावर हळद वाटून विक्री सुरू केली. २००६ मध्ये ‘जीवन ज्योती’ नावाने खाद्यपदार्थ परवाना मिळवून त्यांनी धने आणि मिरची पावडर बनवण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) शी जुळल्यानंतर त्यांच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. ‘संत जनाबाई महिला स्वयंसहाय्यता बचत गटा’च्या माध्यमातून त्यांनी कमी व्याजदरात कर्ज घेतले आणि आधुनिक मशिनरी खरेदी केल्या.

आज यमुनाबाईंच्या युनिटमध्ये बाजरीची खारवडी, बटाटा चकली, गव्हाच्या शेवया, कुरवड्या, पोहे पापड आणि ३ प्रकारच्या मिरचीच्या लोणच्यासह एकूण २१ प्रकारचे पदार्थ तयार होतात. हे पदार्थ केवळ बीड किंवा मुंबईपुरते मर्यादित नसून पुणे, छत्रपती संभाजीनगर, दिल्ली आणि चक्क अमेरिकेपर्यंत पोहोचले आहेत.

तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना उद्योग पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. नुकताच १३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘घे भरारी’ पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

स्वतःच्या हक्काच्या जागेत उभा राहिलेला हा उद्योग आज ग्रामीण भागातील महिलांसाठी एक दीपस्तंभ ठरला आहे.

मी जेव्हा आश्रमात आले तेव्हा शामाताई चाच परिवार या ठिकाणी होता, मुलं कुणी नव्हते। काही वर्षानंतर त्या ठिकाणी मुलांचे वसतिगृह पण काढले आणि त्याच बरोबर वृद्धआश्रमात राहणारे आणि वसतिगृहात राहणाऱ्यांना खायला लागायचे तिथे मिरची ,हळद, धने पावडर रोज खाण्यासाठी लागायची ,हा डोंगराळ भाग असल्याने उपजीविका कशी भागवायची याचा मला प्रश्न पडला आणि आपण काही तरी उद्योग करावा असा प्रश्न पडला, मग मी एक किलो हळद आणून उखळवर कुठली आणि त्याची मार्केटिंग सुरू केली,तेव्हा मला अनुभव आला एक दुकानदार मला म्हणाला इतकी छान हळद आहे तर तुम्ही पॉकेट बनवा मग मी माझ्या आश्रमातील मुलाला घेऊन हैद्राबादला गेले तिथून पॉकेट आणून लक्ष्मी महा बालाजी तिरुपती या नावाने ब्रँड तयार करून हळद विकू लागले मात्र ज्यांच्याकडून बॅग आणल्या त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला आणि मी नंतर स्वतःचा 2006 ला जीवन ज्योती नावाने लायसन्स काढले आणि मी उद्योग सुरू केला. आता मी प्रत्येक वर्षाला नवीन खाद्य पदार्थ बनवते आणि दोन मशीन विकत घेऊन येते. आता माझा व्यवसाय सुरू झाला यातून आश्रमातील 10 ते 15 निराधार तसेच गावातील महिलांना रोजगार मिळू लागला यासाठी मला शासनाने बँकेकडून कर्ज देखील उपलब्ध करून दिले आहे. घे भरारी मध्ये माझी मुंबईत मुलाखत घेतली, तीन दिवसांची ट्रेनिंग दिली आणि पुण्यात मला कार्यक्रमात 16 लाखाचा पुरस्कार दिला. या रकमेतून मी काही मशीन विकत घेतल्या, आज माझा माल महाराष्ट्रातील मुख्य शहरात तसेच दिल्ली आणि अमेरिकेत जात आहे. यातून मला वर्षाला 40 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. शासनाने माझ्याकडे लक्ष देऊन मला आणखी ऑर्डर मिळाव्यात अशी अपेक्षा यमुनाबाईनी व्यक्त केली आहे.


Categories

Recent Posts