Breaking

कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; चिखलबीडमधील दोघांचा जागीच मृत्यू, नागरिकांमध्ये तीव्र संताप

Updated: मे 16, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई-अहमदपूर हायवेवर भीषण अपघात; लातूरच्या २२ वर्षीय तरुण चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी नगर-अहमदपूर मार्गावरील लिंबागणेश येथे शुक्रवारी मध्यरात्री कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, बबन काशिनाथ लगास आणि ज्ञानदेव विष्णू लगास (दोघे रा. चिखलबीड, ता. वडवणी) अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवार, १५ मे रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास भालचंद्र विद्यालय परिसराजवळ विस्टा कार आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.

उपलब्ध माहितीनुसार, विस्टा कार (क्र. एमएच ०५ एएक्स ०३८८) आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्र. एमएच ४४ एए ६२२६) यांच्यात झालेली धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांचा घटनास्थळीच प्राण गेला. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचा भीषण आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे विठ्ठल राठोड आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वरील लिंबागणेश परिसरात गेल्या काही दिवसांत वारंवार जीवघेणे अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts