Breaking

हिंगणी तलावात मासेमारीची होडी उलटून दोन शाळकरी मुलींचा बुडून अंत

Updated: मे 16, 2026

By Vivek Sindhu

हिंगणी तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यु

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दिंद्रुड: धारूर तालुक्यातील हिंगणी येथे शनिवारी (दि. १६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. स्थानिक हिंगणी तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या पाच शाळकरी मुलींपैकी तिघीजण मासेमारीच्या होडीवर बसल्या असता, अचानक होडी उलटून पाण्यात बुडाल्याने दोन चिमुरड्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. पलक शामराव पारवे (वय १४, रा. हिंगणी, ता. धारूर) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) अशी मृत मुलींची नावे आहेत. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे एका मुलीला वाचवण्यात यश आले असले, तरी या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण हिंगणी परिसरावर मातमी कळा पसरली असून गावातील चूलही पेटली नाही.


पारवे कुटुंबातील पलक शामराव पारवे, दिव्या विकास कांबळे, मोहिनी भीमराव पारवे, तन्वी कोंडीराम पारवे आणि जानवी कोंडीराम पारवे या पाच मुली शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे हिंगणी तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या. तलावाच्या काठावर मासेमारीसाठी एक होडी लावून ठेवण्यात आली होती. पोहता पोहता केवळ बालहट्टापायी आणि कौतुकापोटी पलक, दिव्या आणि मोहिनी या तिघीजण त्या होडीवर जाऊन बसल्या. मात्र, पाण्याचा आणि वजनाचा अंदाज न आल्याने होडी तलावात थोडी आत गेली आणि अचानक उलटली. यामुळे तिन्ही मुली थेट खोल पाण्यात फेकल्या गेल्या.


होडी उलटल्याने तिघींचीही पाण्यात जगण्यासाठी भीषण धडपड सुरू झाली. यातील मोहिनी पारवे हिला पोहता येत होते, मात्र पाण्यात बुडत असलेल्या पलक आणि दिव्या यांनी जिवाच्या आकांताने मोहिनीला घट्ट पकडले. यामुळे मोहिनी देखील पाण्यात ओढली गेली आणि तिघीही गटांगळ्या खाऊ लागल्या. हा थरारक प्रकार तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या तन्वी आणि जानवी या लहान मुलींनी पाहिला आणि त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलींचा किंचाळण्याचा आवाज ऐकून जवळच असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी कसलाही विचार न करता तात्काळ तलावाकडे धाव घेतली.

ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उड्या घेतल्या आणि अथक प्रयत्नांनंतर तिन्ही मुलींना बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले. नशिबाने काही वेळाने मोहिनी हिला शुद्ध आली आणि ती या भीषण संकटातून आश्चर्यकारकरित्या बचावली. मात्र, पलक आणि दिव्या यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. ग्रामस्थांनी कोणतीही वेळ वाया न घालवता त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवले. परंतु, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली; डॉक्टरांनी तपासणी करून दोघींनाही मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेमुळे मृत मुलींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts