Breaking

बालनिकेतन सेमी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली लोहिया यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Updated: मे 15, 2026

By Vivek Sindhu

बालनिकेतन सेमी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली लोहिया यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील ॲड. जयसिंग चव्हाण संचलित बालनिकेतन सेमी इंग्लिश स्कूल व जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली संजय लोहिया यांना पुणे येथे आयोजित एका भव्य समारंभात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरवण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय, मूल्याधिष्ठित आणि नावीन्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, यामुळे अंबाजोगाईच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर पडली आहे.

पुणे येथे पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती. हा सर्वोच्च बहुमान स्वीकारताना व्यासपीठावर अंजली लोहिया यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र तथा पुण्याचे युवा उद्योजक रोहनिल संजय लोहिया, पलक भुतडा आणि लातूरचे युवा उद्योजक शुभम भुतडा प्रामुख्याने उपस्थित होते. लोहिया यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, गुणवत्ता वृद्धीसाठी राबवलेले विविध उपक्रम आणि संस्कारक्षम शिक्षणाची केलेली जोपासना या समर्पित कार्याची पावती म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे.

अंजली लोहिया यांनी आपल्या कर्तृत्व, जिद्द आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. लोहिया यांच्या या धडपडीचे कौतुक करताना संस्थेचे अध्यक्ष जयसिंग चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात नेहमीच काहीतरी नवीन आणि दर्जेदार शिकायला मिळावे यासाठी त्या सदैव तत्पर असतात, त्यांचे हे यश संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयसिंग चव्हाण, संचालक अजित माने, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी अंजली लोहिया यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या पुरस्कारामुळे संपूर्ण अंबाजोगाई शहरासह बालनिकेतन परिवाराची मान उंचावली असून, हा क्षण शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इतर सर्व शिक्षकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.


Categories

Recent Posts