Breaking
Updated: जून 2, 2026
लग्नाची लगबग सुरू असतानाच काळाचा घाला; हायवाच्या धडकेत नवरदेवाचा जागीच मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: परतूर आष्टी मार्गावरील दैठणा बुद्रुक गावाजवळ हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. सोमवार, १ जून रोजी झालेल्या या अपघातात लग्नाची स्वप्ने रंगवणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राम आसाराम कोल्हे असे या मृत तरुणाचे नाव असून तो गोळेगाव येथील रहिवासी होता. अवघ्या अठरा दिवसांवर लग्न आले असतानाच काळाने घातलेल्या या घालामुळे कोल्हे कुटुंबासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
राम कोल्हे हा तरुण परतूर येथील आपली कामे आटोपून शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाने आष्टीकडे परतत होता. दैठणा बुद्रुक पाटीजवळ पोहोचला असता, आष्टीकडून कच घेऊन येणाऱ्या हायवाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रामचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त हायवा ताब्यात घेतला असून, अपघातानंतर चालक फरार झाला आहे. पोलिसांनी मृतदेह परतूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आणि त्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला.
रामचा विवाह येत्या १९ जून रोजी नियोजित होता. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती, नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच तरुणाचा असा करुण अंत झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. फरार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.