Breaking
Updated: डिसेंबर 13, 2025
बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून तसेच चालकाला झोप लागल्याची संधी साधत वाहनांच्या काचा फोडून प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी थरारक पाठलाग करून धाराशिव जिल्ह्यातील तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून एक दरोडा आणि तीन जबरी चोरीचे असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईमुळे महामार्गावरील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यात महामार्गावर लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या टोळीने ४ डिसेंबर २०२५ रोजी गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव ढोक येथे चक्क रस्त्यावर जॅक टाकून गाडी अडवली होती आणि परराज्यातील प्रवाशांना मारहाण करून सोन्याचे दागिने व रोकड लुटली होती. तसेच बीड ग्रामीण हद्दीत २५ सप्टेंबर रोजी संभाजी महाराज चौक, २० नोव्हेंबर रोजी हॉटेल दुबई समोर आणि ९ नोव्हेंबर रोजी पाली येथील आयआरबी पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली होती. या गंभीर घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन करून कारवाईचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर आणि त्यांच्या पथकाला ११ डिसेंबर रोजी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, वरील गुन्हे करणारे आरोपी हे एका चारचाकी वाहनातून कळंबकडून केजच्या दिशेने येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी वाहन न थांबवता पळ काढला, मात्र पथकाने काही अंतरापर्यंत पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांचे वाहन अडवले आणि आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत राहुल अनिल काळे (वय १९), विकास अनिल काळे (वय २१) आणि अनिल रामा काळे (वय ४०, तिघेही रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली विना क्रमांकाची काळ्या रंगाची एमजी हेक्टर कार, वाहनाच्या डिक्कीत लपवलेला एक कोयता आणि लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. पोलीस चौकशीदरम्यान अटक केलेल्या आरोपींनी सुनील हिरामन शिंदे, सचिन उर्फ आवडया रामा काळे आणि बबलू शिवा शिंदे या आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी गेवराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार हे करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर आणि अंमलदारांच्या पथकाने केली आहे.