Breaking

ऑनलाइन फ्रॉडची संपूर्ण रक्कम तक्रारदाराला मिळवून दिली, बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य आरोपी गजाआड

Updated: जून 3, 2026

By Vivek Sindhu

715120574 28065341119732628 6474703168712529460 n

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: येथील सायबर पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत एका महिला तक्रारदाराची ऑनलाइन फसवणूक झालेली १ लाख ३३ हजार ९९५ रुपयांची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीकृष्ण गोवर्धन आंधळे (रा. हिंगणी, ता. जि. बीड) याला पोलिसांच्या तांत्रिक सेलने २ जून २०२६ रोजी चौसाळा येथून ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिंगणी येथील रहिवासी मिनाक्षी दत्ता आंधळे यांचे मोबाईल आणि सिमकार्ड वापरून आरोपींनी त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ३३ हजार ९९५ रुपये ऑनलाइन फसवणूक करून काढून घेतले होते. याप्रकरणी बीड सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आयटी ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँकेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासाच्या पहिल्या टप्प्यात पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींकडून ८९ हजार रुपये जप्त केले होते. मात्र, मुख्य आरोपी पोलिसांना गुंगारा देत पुणे, अहिल्यानगर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये लपून बसला होता. अखेर २ जून रोजी बीड तांत्रिक सेलला मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी चौसाळा येथून मुख्य आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून उर्वरित ४५ हजार रुपये हस्तगत केले. बीडचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.


Categories

Recent Posts