Breaking

शिक्षणाचा विषय देशाच्या अजेंड्यावर आल्याने डॉ.संतोष बोबडे लिखित पुस्तकाचे आज महत्त्व – ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब

Updated: जून 23, 2026

By Vivek Sindhu

डॉ.बोबडे लिखित 'विद्यार्थ्यांची वाटचाल' या ग्रंथाचे प्रकाशन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

डॉ.संतोष बोबडे हे शिक्षण क्षेत्रातील एक रत्न आहेत – प्रा.नानासाहेब गाठाळ

डॉ.बोबडे लिखित ‘विद्यार्थ्यांची वाटचाल’ या ग्रंथाचे प्रकाशन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – आपल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक अनुभवातून डॉ.संतोष बोबडे यांनी लिहिलेल्या विद्यार्थ्यांची वाटचाल (पालक, शिक्षक, विद्यार्थी व समाजाची जबाबदारी) या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी, ‘शिक्षणाचा विषय देशाच्या अजेंड्यावर आल्याने डॉ.संतोष बोबडे लिखित पुस्तकाचे आज महत्त्व आहे असे नमूद केले.’ तर ‘डॉ.संतोष बोबडे हे शिक्षण क्षेत्रातील एक रत्न आहेत असे गौरवोद्गार ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ यांनी काढले. मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत डॉ.संतोष बोबडे लिखित ‘विद्यार्थ्यांची वाटचाल’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

शैक्षणिक व मानसशास्त्रीय विषयावर आधारित असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन रविवार, दि.२१ जून २०२६ रोजी आधार मल्टीस्टेट सभागृह, अंबाजोगाई (जि.बीड) येथे अमर हबीब (साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादाहरी कांबळे (माजी प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, अंबाजोगाई) हे होते‌. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश घोरपडे, प्रा.नानासाहेब गाठाळ (संस्थापक संपादक, दै.विवेकसिंधू), डॉ.कमलाकर कांबळे (माजी प्राचार्य, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई) आणि गोविंदराव चक्रवार (संचालक, राहुल संगणक टंकलेखन संस्था) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला मान्यवरांकडून दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत केले. प्रास्ताविक करताना ‘विद्यार्थ्यांची वाटचाल’ या ग्रंथाचे लेखक डॉ.संतोष बोबडे यांनी सांगितले की, ‘विद्यार्थ्यांची वाटचाल (पालक, शिक्षक, विद्यार्थी व समाजाची जबाबदारी) या ग्रंथात अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. जी सर्व समाजातील विविध वयोगटातील घटकांसाठी उपयुक्त आहे. प्रत्येकाने वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा असा सुबक छपाई, आकर्षक व नेमके मुखपृष्ठ असलेला ग्रंथ आहे. सदरील ग्रंथात शिक्षण, समाजकारण व प्रबोधन क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचे शुभेच्छापर संदेश आहेत. जे ग्रंथाला व आमच्या सकारात्मक प्रयत्नांना अधिक उंची प्राप्त करून देतात. मी मागील अनेक वर्षांपासून शिक्षण, समाजकारण, धम्म कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आहेत. पालक, शिक्षक, विद्यार्थी यांना हा ग्रंथ निश्चितच आवडेल असा मला विश्वास वाटतो.’ असे लेखक डॉ.बोबडे यांनी सांगितले. प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांनी ‘विद्यार्थ्यांची वाटचाल’ (पालक, शिक्षक, विद्यार्थी व समाजाची जबाबदारी) या ग्रंथाचे विमोचन केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी सांगितले की, ‘शिक्षणाचा विषय देशाच्या अजेंड्यावर आल्याने या पुस्तकाचे आज मोठे महत्त्व आहे. सध्याचा काळ खूप महत्त्वाचा आहे अशा काळात एक शिक्षक मनातून अस्वस्थ आहे. हा अस्वस्थ शिक्षक विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवा असा संदेश व्यवस्थेला देत आहे.‌ पगार महत्वाची नाही तर पगारी पेक्षा या शिक्षकाला विद्यार्थी महत्त्वाचा वाटतो. तो शिक्षक म्हणजे डॉ.संतोष बोबडे होय, या पुस्तकातून लेखकाने प्रत्येकाला काही तरी सांगितले आहे. ज्या गोष्टी घडत नाहीत. त्या गोष्टी विद्यार्थ्यांची वाटचाल या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील ज्या गोष्टी अंडरलाईन केल्या पाहिजेत त्याचा मजकूर या पुस्तकात आहे. डॉ.संतोष बोबडे हे सचोटीचे शिक्षक आहेत. ते प्रामाणिकपणे लिहीत आहेत. सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रात ही ते कार्यरत आहेत’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हबीब यांनी केले. तर सुरूवातीला शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना माजी आमदार साठे म्हणाले की, ‘बोबडे सर लिखित पुस्तक समाजातील सर्व घटकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.‌ आजची पिढी मोबाईलमुळे भरकटत चालली आहे. तेव्हा अशा काळात मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी व चांगला समाज निर्माण करण्याची जबाबदारी डॉ.बोबडेंसारख्या शिक्षकांची आहे’ असे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केले. त्यानंतर बोलताना प्रा.नानासाहेब गाठाळ म्हणाले की, ‘ सन 1998 पासून बोबडे हे माझ्या संपर्कात आहेत. ते शिक्षण क्षेत्रातील एक रत्न आहेत. त्यांच्याकडे जिद्द आणि चिकाटी हे गुण आहेत. सदरील पुस्तकातून त्यांनी समाजातील विविध घटकांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे हे पुस्तक उत्कृष्ट असल्याचे गाठाळ यांनी सांगितले’. तर डॉ.कमलाकर कांबळे यांनी ‘वाढती महागाई, तसेच अन्य काही गोष्टींमुळे पुस्तक निर्मिती प्रक्रिया ही कठीण बाब आहे असे सांगितले. व बोबडे हे निष्ठावंत शिक्षक आहेत. खूप वर्षे अध्यापन केल्यानंतर त्यांनी समाजातील विविध घटकांची भुमिका अधोरेखित केली आहे’ असे विचार डॉ.कांबळे यांनी मांडले. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना माजी प्राचार्य दादाहरी कांबळे यांनी, ‘अध्यापन हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. लेखक डॉ.बोबडे यांच्या पुस्तकाचे शीर्षक लक्षवेधी आहे असे सांगितले. आपल्या अनुभवातून विविध दाखले देत समाजातील शिक्षण व शिक्षकाचे महत्त्व’ कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सभागृहासमोर ठेवले. ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे बहारदार सुत्रसंचालन प्रा.अनंत कांबळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार राजेश मस्के यांनी मानले. याप्रसंगी मुख्याध्यापक भागवत हावळे, आधार मल्टीस्टेटचे अध्यक्ष ऍड.सुनिल सौंदरमल, राजू वंजारे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक डॉ.कमलाकर राऊत, प्रा.दादाराव धाकडे यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवर, शिक्षक, पालक, पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाईतील पत्रकार परमेश्वर गित्ते, राहूल देशपांडे, प्रशांत लाटकर, दिलीप आरसूळ, संतोष केंद्रे, शेख फेरोज, संजय जोगदंड या पत्रकार बांधवांसह, आंतरभारती शाखा अंबाजोगाईचे सर्व सदस्य, आणि प्रा.विनायक घायाळ, प्राचार्य अमर मुळे, डॉ.सुदर्शन मुंडे, रूपेश जोगदंड, डॉ.पंकज घोरपडे, अनंत बोबडे, संचिता बोबडे, सूनिल जोगदंड, रघुनंदन रामदासी, बालासाहेब सोनवणे, वसंतराव वाघमारे, राजेश मस्के, प्रा.डॉ.रवींद्र आचार्य, सचिन टिळक, अक्षय वाघमारे आदींसह मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला होता.


Categories

Recent Posts