Breaking
Updated: जून 23, 2026
गाडी लावण्याच्या किरकोळ वादातून वृद्ध शेतकऱ्याला आणि सुनेला बेल्टने बेदम मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील वाघाळवाडी येथे रस्त्यावर गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एका ७२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला आणि त्यांच्या सुनेला बेल्ट व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. २२ जून २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू शामराव सावंत असे या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी याप्रकरणी पोलिसांत रीतसर फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध शेतकरी विष्णू सावंत हे वाघाळवाडी परिसरात असताना गावातीलच आरोपी नरसिंग जनार्धन बिडवे हा दारू पिऊन त्या ठिकाणी आला. रस्त्यावर गाडी लावण्याच्या कारणावरून त्याने सावंत यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, आरोपी नरसिंग याने स्वतःच्या कमरेचा बेल्ट काढून सावंत यांच्या पाठीवर, हातावर आणि तोंडावर बेदम प्रहार करत त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार पाहून सावंत यांची सून त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडली असता, नराधम आरोपीने तिलाही अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार घोळवे पुढील तपास करत आहेत.