Breaking

ज्येष्ठ पत्रकार अशोक गुंजाळ यांना ‘राज्यस्तरीय कृतज्ञता जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर; १६ मे रोजी तांबवे येथे होणार गौरव सोहळा

Updated: मे 2, 2026

By Vivek Sindhu

१६ मे रोजी तांबवे येथे होणार गौरव सोहळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे येथील नामांकित ‘नामदेवदादा प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय कृतज्ञता जीवन गौरव पुरस्कार’ अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गुंजाळ यांना जाहीर करण्यात आला आहे. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या दीर्घकालीन आणि उल्लेखनिय योगदानाची दखल घेऊन प्रतिष्ठानने हा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्व. नामदेवदादा पाटील यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून या विशेष पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. अशोक गुंजाळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले असून, त्यांच्या याच जनसेवेचा आणि कर्तृत्वाचा गौरव या पुरस्काराच्या रूपाने केला जाणार आहे. या निवडीबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे अधिकृत पत्राद्वारे अभिनंदन करण्यात आले आहे.

हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी रात्री ७.३० वाजता सांगली जिल्ह्यातील तांबवे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. प्रतिष्ठानने गुंजाळ यांना या सोहळ्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, त्यांच्या निवडीचे पत्र अधिकृतपणे प्रसिद्धीसाठी दिले आहे.

सदर पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील मंत्री, उपाध्यक्ष प्रा. जयदीप पाटील आणि सचिव डॉ. सुवर्णा पाटील यांनी केली आहे. राज्यस्तरावरील या मानाच्या पुरस्कारामुळे अशोक गुंजाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या सामाजिक कार्यास यामुळे अधिक बळ मिळणार आहे. सद्यस्थितीत पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी जोपासलेली मूल्ये आणि निस्पृह कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे, असे मत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.


Categories

Recent Posts