Breaking

पाटोद्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या अंगावर कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न; अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

Updated: मे 26, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत गोट फार्मची जाळी कापून शेळ्यांची चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा: तालुक्यातील करंजवण फाटा येथे सिमेंट रस्त्याच्या कामाच्या पैशांवरून व पूर्ववैमनस्यातून एका २६ वर्षीय दलित तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करंजवण येथील रहिवासी राहुल नवनाथ सोनवणे यांना ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीमधील सिमेंट रस्त्याचे सहा लाखांचे काम मिळाले होते, ज्याचे बिलही त्यांना मिळाले होते. या कामातील ३ लाख रुपयांच्या हिशाची मागणी करत गावातीलच महादेव भीमराव खाडे आणि रतन भीमराव खाडे हे राहुल यांना नेहमी धमकावत असत. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राहुल हे आपल्या मोटारसायकलवरून करंजवण फाट्याकडे जात असताना, आरोपी महादेव खाडे याने आपली स्विफ्ट कार (क्र. MH 16 BY 9347) थेट राहुल यांच्या अंगावर घातली. राहुल यांनी प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात घेतल्याने ते बालंबाल वाचले.

या जीवघेण्या हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी कारमधून उतरून राहुल यांना जातीवाचक शिवीगाळ केली, ‘गावात राहू देणार नाही व घर जाळून टाकू’ अशी धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिथे उपस्थित असलेल्या मित्रांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. पीडित राहुल सोनवणे यांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलिसांनी महादेव खाडे आणि रतन खाडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अ‍ॅट्रॉसिटी) विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक विनोद उत्तम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक बाळकृष्ण हनपुडेपाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts