Breaking
Updated: मे 26, 2026
माजलगावात चोरट्यांचा सुळसुळाट; बसस्थानकातून व रस्त्यावरून दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: शहर आणि परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांचे सुमारे १ लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना १६ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास माजलगाव नवीन बसस्थानकावर घडली. येथील सरकारी दवाखान्याजवळील क्वार्टरमध्ये राहणाऱ्या महिला शिपाई शारदा बाबू गायसमुद्रे या छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी माजलगाव-गेवराई बसमध्ये चढत होत्या. त्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख २ हजार रुपये किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अत्यंत चालाखीने लंपास केले.
दुसऱ्या घटनेत २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता केसापुरी कॅम्प येथील रहिवासी शीला पंकज साळवे या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून संभाजी महाराज चौकाकडे जात होत्या. ब्रम्हागाव शिवारातील साबळे हॉस्पिटल समोर दोन अज्ञात दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांच्या चालत्या दुचाकीला आपली गाडी घासली आणि शीला यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून बायपास रोडने पळ काढला.
या दोन्ही घटनांबाबत पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस निरीक्षक राहुल कामाजी सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केरबा माकणे आणि हवालदार गोविंद पाखरे या दोन्ही चोऱ्यांचा पुढील तपास करत आहेत.