Breaking
Updated: मे 19, 2026
रस्ता सोडण्याच्या कारणावरून तरुणावर कोयता आणि विटांनी हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा: प्लॉटमध्ये काम सुरू असताना रस्ता सोडण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सहा जणांच्या टोळक्याने संगणमत करून एका तरुणावर कोयता आणि विटांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भिमनगर येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्यात कोयता लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या साक्षीदारांनाही बेदम मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी भिमनगर पाटोदा येथील रहिवासी असलेले ३८ वर्षीय रिक्षाचालक पणु शामराव जावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सत्यभामा सुनील जावळे, सनी सुनील जावळे, अमोल सुनील जावळे, करण सुनील जावळे, नवनाथ सैनाजी जावळे आणि सूरज नवनाथ जावळे (सर्व रा. भिमनगर पाटोदा, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी पणु जावळे हे आपल्या प्लॉटमध्ये जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदण्याचे काम करत होते. यावेळी जेसीबी मशीन रस्त्यावर उभी होती. त्याच वेळी आरोपी करण जावळे हा दुचाकीवरून तेथे आला आणि ‘मी कोठून जायचे?’ असे म्हणत हुज्जत घालू लागला. फिर्यादीने त्याला वाचनालयाच्या पाठीमागून जाण्याचा सल्ला दिला. याचा तीव्र राग मनात धरून करण याने घरी जाऊन इतर आरोपींना बोलावून आणले.
सर्व आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून आणि संगणमत करून फिर्यादीच्या घरासमोरील बांधकामाच्या ठिकाणी धाव घेतली. आरोपींनी फिर्यादी आणि तिथे उपस्थित साक्षीदारांना शिवीगाळ करत विटा आणि कोयत्याने हल्ला चढवला. या धुमश्चव्हीत फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याचा वार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रेड पोलीस उपनिरीक्षक टिपरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.