Breaking
Updated: मे 26, 2026
दारू दुकानावरील कामगाराची हत्या करणारा दुकानमालक गजाआड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारूच्या दुकानात हिशोबाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३५ वर्षीय कामगाराची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मंगळवारी (२६ मे) अत्यंत शिताफीने अटक केली. उमेश नवनाथ दळवी असे मृत कामगाराचे नाव असून, शेख इरफान उर्फ लाला शेख समद (वय ३८, रा. बालेपीर, बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मृत उमेश यांच्या पत्नी संगीत दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी बालेपीर भागातील एका दारूच्या दुकानात हिशोबावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन शेख इरफान याने उमेश दळवी यांना जीवे मारले. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या विशेष पथकाला आरोपी बालेपीर भागातच लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला पुढील तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने केली.