Breaking

बीडमध्ये तरुणाची हत्या; दारू दुकानावरील हिशोबाच्या वादातून मालकानेच संपवले, ॲट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल

Updated: मे 25, 2026

By Vivek Sindhu

बीडमध्ये तरुणाची हत्या; दारू दुकानावरील हिशोबाच्या वादातून मालकानेच संपवले, ॲट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: बीड शहरातील बालेपीर रोडवरील एका दारू दुकानात काम करणाऱ्या ३५ वर्षीय मागासवर्गीय समाजाच्या तरुणाची पैशांच्या आणि हिशोबाच्या वादातून दुकानाच्या मालकानेच बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुकान मालकावर हत्येसह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मयत उमेश नवनाथ दळवी हा बीड येथील गोरे वस्ती भागातील रहिवासी असून तो सहारा हॉटेलसमोरील लाला शेख यांच्या दारू दुकानात मजुरीचे काम करत होता. दुकानाच्या हिशोबात काहीतरी घोळ झाल्याचा संशय आल्याने दुकानाचा मालक शेख इरफान शेख समद उर्फ लाला हा उमेशला सातत्याने पैशांची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देत होता. आरोपीने यापूर्वीही उमेशला दुकानात काम व्यवस्थित करत नसल्याचे कारण काढून मारहाण केली होती. २३ मे रोजी सकाळी उमेश नेहमीप्रमाणे कामावर जात असताना, त्याने आपल्या पत्नीला मालकाकडून मिळणाऱ्या धमक्यांबाबत सांगितले होते. त्यानंतर २४ मे रोजी पहाटेच्या सुमारास बालेपीर नगर रोडवरील महेबुब नर्सरी जवळील दुकानात आरोपीने उमेशला गंभीर दुखापत होईपर्यंत बेदम मारहाण केली आणि त्याला अर्धबेशुद्ध व जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. उपचार सुरू असतानाच उमेशचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत उमेशची पत्नी संगीता उमेश दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी शेख इरफान शेख समद उर्फ लाला याच्याविरुद्ध हत्येसह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक वेंकटराम हे करत आहेत.


Categories

Recent Posts