Breaking

अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

Updated: मे 21, 2026

By Vivek Sindhu

मिलिंद कर्‍हाडे यांचा सहकुटुंब आमरण उपोषणाचा इशारा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मिलिंद कर्‍हाडे यांचा सहकुटुंब आमरण उपोषणाचा इशारा

अंबाजोगाई येथील इनाम प्रतिबंधित मालकीच्या जमिनीच्या प्रकरणात नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर फेरफार आणि बोगस रेखांकन आदेश दिल्याचा आरोप करत तहसीलदार विलास तरंगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावे, या मागणीसाठी अर्जदार मिलिंद मधुकरराव कर्‍हाडे यांनी सहकुटुंब आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. मौजे अंबाजोगाई येथील १५ एकर १ गुंठा जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी तहसीलदार तरंगे यांनी आर्थिक भ्रष्टाचारातून अधिकारांचा गैरवापर केल्याचा थेट आरोप कर्‍हाडे यांनी प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे अंबाजोगाई येथील सर्वे नंबर ३८१/१ मधील १५ एकर ०१ गुंठा ही इनाम प्रतिबंधित मालकीची जमीन वाटणी व हस्तांतर अयोग्य या शर्तीवर अर्जदाराचे आजोबा पंडिताचार्य बाळाचार्य कर्‍हाडे यांना सरकारकडून मिळाली होती. नियमानुसार या जमिनीचा उपभोग केवळ मूळ मालक किंवा त्यांचे वारसदारच घेऊ शकतात. तसेच बीड जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीशिवाय या जमिनीच्या सातबारा अभिलेखात कोणताही फेरबदल करता येत नाही. असे असतानाही तहसीलदार विलास तरंगे यांनी या नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून मूळ मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या नावांच्या नोंदीला बेकायदेशीरपणे मान्यता दिली.

याशिवाय, सदर जमिनीच्या रेखांकन मंजुरी प्रस्तावाचे (लेआउट) अधिकार अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे असताना, तहसीलदार तरंगे यांनी या अधिकारांचा बेकायदेशीर वापर करून बोगस रेखांकन आदेश तयार केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या बोगस आदेशामुळे सर्वसामान्य जनतेची फसवणूक होण्याची भीती निर्माण झाली असून, हा प्रकार पूर्णपणे गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्यामुळे तहसीलदार विलास तरंगे यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आपल्याला सहकुटुंब आमरण उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा मिलिंद कर्‍हाडे यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


Categories

Recent Posts