Breaking
Updated: मे 22, 2026
परळीत हॉटेल चालकाची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला घात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: परळी वैजनाथ शहरात पैशांच्या किरकोळ वादातून एका हॉटेल चालकाची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारभारी नारायण आंधळे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने परळी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मृत कारभारी आंधळे हे परळीत पवन हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. २१ मे रोजी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर कारभारी आंधळे हे संशयित आरोपी सचिन सोमनाथ राठोड आणि सुमीत पवार यांच्यासोबत दारू पीत बसले होते. दारू पित असतानाच त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून अचानक वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. संशयित आरोपी सचिन राठोड याने कारभारी आंधळे यांना घट्ट पकडून ठेवले, तर सुमीत पवार याने आपल्या जवळील धारदार चाकूने कारभारी यांच्या मानेवर आणि हातावर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कारभारी आंधळे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.
घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सचिन राठोड यानेच कारभारी आंधळे यांच्या लहान मुलाला फोन करून तुमचे वडील जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मृताचा मोठा मुलगा ओमकेश आंधळे आणि नातेवाईक तातडीने परळी येथील अरुणोदय मार्केट लाईन परिसरातील मोकळ्या जागेत धावले. तेथे कारभारी आंधळे हे निपचित पडलेले आढळून आले. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी ओमकेश आंधळे याच्या फिर्यादीवरून परळी पोलिसांनी सचिन राठोड आणि सुमीत पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सचिन राठोड यास ताब्यात घेतले असून सुमित पवार फरार झाला आहे. पोलीस उपनिरिक्षक नितीन गट्टूवार पुढील तपास करत आहेत.