Breaking

धर्मापुरीत राजकीय वैमनस्यातून परस्परविरोधी तलवारी उपसल्या

Updated: मे 25, 2026

By Vivek Sindhu

धर्मापुरीत राजकीय वैमनस्यातून परस्परविरोधी तलवारी उपसल्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

एका गटावर शस्त्रास्त्र अधिनियमान्वये तर दुसऱ्या गटावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल

परळी: बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या धर्मापुरी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या जुन्या राजकीय वैमनस्यातून दोन गट आमनेसामने आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही गटांकडून हातात तलवारी आणि लाठ्या-काठ्या घेऊन गावात प्रचंड दहशत माजवण्यात आली असून, परळी ग्रामीण पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या थरारकाप उडवणाऱ्या घटनेमुळे धर्मापुरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एका बाजूने फिर्यादी अमोल गौतम क्षीरसागर (वय २९ वर्षे, व्यवसाय चालक, रा. धर्मापुरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता ते गोविंद फड यांच्या ऑफिसबाहेर वाढदिवसाच्या निमित्ताने साफसफाई करत होते. त्यावेळी गावातील तुषार अशोक फड आणि कृष्णा नामदेव चाटे हे हातात तलवारी घेऊन तिथे आले. त्यांनी “गरीबांना खूप लुटले आहे, आज एका एकाला बघून घेतो” असे म्हणून शिवीगाळ करत गोविंद फड यांना जिवे मारण्याची धमकी दिली व दहशत माजवली. त्यानंतर तुषार फड याच्यासह त्याचे भाऊ अनिकेत फड, निलेश फड आणि कृष्णा चाटे यांनी पुन्हा हातात तलवारी घेऊन येत धमकी दिल्यामुळे गावातील दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने पटापट बंद केली आणि लोक सैरावैरा पळू लागले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी चार जणांवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि दहशत माजवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५१(२), ३(५) आणि शस्त्र अधिनियम २५ व ४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तर दुसऱ्या बाजूच्या तक्रारीनुसार, त्याच दिवशी सायंकाळी ६ ते ६:३० वाजेच्या दरम्यान जिजामाता शाळेसमोर दुसरी हिंसक घटना घडली. यामध्ये संदीप मंचकराव फड (वय ३३ वर्षे, व्यवसाय चालक, रा. धर्मापुरी) यांनी अंबाजोगाई येथील रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल झाला आहे. संदीप फड यांच्या सांगण्यानुसार, ते त्यांचे मालक तुषार फड आणि कृष्णा चाटे यांच्यासोबत किराणा साहित्य घेऊन जात असताना, जुन्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादाचा राग मनात धरून ओमकेश पाटलोबा फड, साहिल गोविंद फड, गणेश बालाजी फड, रमेश भीमराव फड आणि अक्षय पाटलोबा फड यांनी त्यांना अडवले. “तू आमच्या विरोधात निवडणूक का लढवलीस” असे म्हणून ओमकेश फड याने जिवे मारण्याच्या उद्देशाने संदीप यांच्या डोक्यात पाठीमागून तलवार मारली. तर साहिल फड याने लाकडी दांड्याने आणि इतर साथीदारांनी काठ्यांनी बेदम मारहाण करून संदीप फड व कृष्णा चाटे यांना गंभीर जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१) आणि ११८(२), १८९(२) आणि १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(३) तसेच शस्त्र अधिनियम कलम २५ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

राजकीय वादातून गावात उघडपणे तलवारी नाचवून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंढके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


Related Posts :

Categories

Recent Posts