Breaking
Updated: मार्च 14, 2026
विषारी औषध प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका २६ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना तालुक्यातील चाहुरतांडा तालखेड येथे घडली असून, या प्रकरणी मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पती, सासरा आणि सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, तळातांडा तालखेड येथील सुंदराबाई शामराव राठोड यांची मुलगी ज्योती हिचा विवाह २०१८ मध्ये कृष्णा मनोहर पवार याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे चांगले नांदवल्यानंतर सासरच्या मंडळींनी ज्योतीचा छळ करण्यास सुरुवात केली. “तू रंगाने काळी आहेस, तू मला आवडत नाहीस” असे म्हणत पती कृष्णा हा तिच्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करत असे. तसेच पतीच्या गुत्तेदारीच्या कामासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करत तिला उपाशी ठेवले जात होते आणि शेतात राबवून घेतले जात होते.
या सततच्या जाचाला कंटाळून ज्योतीने १२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे राहत्या घरी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले . तिला तातडीने माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र, १८ जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पती कृष्णा मनोहर पवार, सासरा मनोहर पवार आणि सासू ताराबाई मनोहर पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद पांडव करत आहेत.