Breaking

‘आम्ही पोलीस’ म्हणत पिंपळनेर रस्त्यावर मच्छिमाराला लुटले; सोन्याच्या अंगठ्या चोरीला

Updated: मे 19, 2026

By Vivek Sindhu

सोन्याच्या अंगठ्या चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर: शिरूर ते पिंपळनेर रस्ता परिसरात ‘आम्ही पोलीस आहोत’ असा बहाणा करून तीन अज्ञात भामट्यांनी एका वृद्ध मच्छिमाराची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी वृद्धाला धाक दाखवून त्यांच्या हातातील ३ सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण काशीनाथ कट्टे (वय ६५, व्यवसाय मच्छिमारी, रा. पिंपळनेर, ता. शिरूर कासार) हे १८ मे रोजी सकाळी मोटारसायकलवरून शिरूर कासार येथे आठवडी बाजारासाठी आले होते. बाजार करून ते त्यांच्या ओळखीचे अवधूत रामराव महाडीक यांच्यासह गावी परतत होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास रस्त्यावरील आजबराव बडे यांच्या घरासमोर दोन मोटारसायकलवरून आलेल्या तीन इसमांनी त्यांना थांबवले. “आम्ही पोलीस आहोत, सध्या चोऱ्या जास्त होत आहेत, तुम्ही हातात सोन्याच्या अंगठ्या घालून कुठे फिरता?” असे म्हणत त्यांनी कट्टे यांना घाबरवले. सुरक्षेचे कारण देऊन त्यांनी ५-५ ग्रॅमच्या तीन अंगठ्या कागदात गुंडाळून स्वतःकडे घेतल्या.

आपली फसवणूक होत असल्याचे कट्टे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला आणि सोबतच्या अवधूतने आरोपींची एक मोटारसायकल धरून ठेवली. मात्र, लोक जमा होत असल्याचे पाहून तिन्ही भामटे त्यांच्या दुसऱ्या मोटारसायकलवर बसून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींची एक मोटारसायकल जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४, ३(५) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वसंत जायभाये पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts