Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
मध्यप्रदेशातील तीन बालकामगारांची सुटका, मालकासह मॅनेजरवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगाव रोडवरील बळीराजा बियर बारवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मध्यप्रदेशातून कष्टाच्या कामासाठी आणलेल्या तीन बालकामगारांची सुटका करण्यात आली असून, बार मालकासह हॉटेल मॅनेजरवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिरा महादेव रेडेकर (नेमणूक- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बीड) यांनी या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास प्रतिबंधक कक्षाचे पथक गेवराई हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना बळीराजा बियर बारमध्ये बालकामगार काम करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने बारमध्ये जाऊन पाहणी केली असता, तेथे तीन अल्पवयीन मुले वेटरचे काम करताना मिळून आली. सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये संजय सूरज एके (वय १५ वर्षे), अमरू अमरसिंग उलके (वय १४ वर्षे) आणि अक्षय राजेश वरकडे (वय १४ वर्षे) यांचा समावेश असून हे तिघेही मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या मुलांनी चौकशीत सांगितले की, बार मालकाने त्यांना कामासाठी त्यांच्या गावातून येथे आणले होते.
या प्रकरणी बळीराजा बियर बारचे मालक बाळू विठ्ठल दाभाडे (रा. पाडळशिंगी) आणि हॉटेल मॅनेजर अशोक सुखदेव मोरे (रा. पाडळशिंगी) यांच्या विरोधात बालकामगार अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(४), १४६ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मिरा रेडेकर, शोभा जाधव, येवले आणि जाधव यांच्या पथकाने केली असून पोलीस हवालदार लक्ष्मण जायभाये पुढील तपास करत आहेत.