Breaking

जमिनीच्या वादातून सख्या भावाकडून जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत दांपत्याला केले जखमी

Updated: एप्रिल 21, 2026

By Vivek Sindhu

लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत दांपत्याला केले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे जमिनीच्या कारणावरून सख्या भावांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलोपार्जित आणि आईकडून मिळालेल्या जमिनीच्या वाटणीवरून हा वाद झाला असून, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला लोखंडी रॉड व लाकडी काठीने गंभीररीत्या जखमी केले आहे.

या प्रकरणी महादेव श्रीमती गंगणे (वय ५५ वर्षे, रा. राडी) यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांची पत्नी कमलाबाई ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. यावेळी त्यांचा भाऊ बळीराम श्रीमती गंगणे, पुतणे अक्षय बळीराम गंगणे, अजय बळीराम गंगणे आणि भावजय सरलाबाई बळीराम गंगणे हे संगणमत करून दोन मोटारसायकलवरून तिथे आले. आरोपी अजयने जिवे मारण्याच्या उद्देशाने आपली मोटारसायकल महादेव यांच्या अंगावर घातली. त्यानंतर अक्षयने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर उजव्या बाजूला प्रहार केला. या झटापटीत भाऊ बळीरामने काठीने महादेव यांच्या हातापायावर आणि पाठीवर मारहाण केली, तर सरलाबाईने फिर्यादीच्या पत्नीला लाकडी काठीने बेदम मारले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महादेव यांच्यावर लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३(५) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ जगताप करत आहेत.


Categories

Recent Posts