Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
कोयत्याने वार करून तरुणाचे बोट तोडले; पाटोद्याच्या भुरेवाडीत जुन्या वादातून जीवघेणा हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा: तालुक्यातील भुरेवाडी येथे “वडिलांना त्रास का देता?” या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणावर कोयत्याने भीषण हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुणाच्या उजव्या हाताचे एक बोट तुटले असून इतर तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पाटोदा पोलिसांनी चार नामजद आणि चार अनोळखी अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
भुरेवाडी येथे १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी बाळू भीमराव पोले (वय २२) हे आपल्या कुटुंबासह घरासमोर उभे असताना दोन पांढऱ्या रंगाच्या गाड्यांमधून आरोपी बिभीषण मधुकर पोले, अशोक मधुकर पोले आणि इतर चार अनोळखी व्यक्ती आले. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक मधुकर किसन पोले आणि लताबाई मधुकर पोले हे देखील उपस्थित होते.
आरोपींनी “माझ्या वडिलांना नेहमी त्रास का देता?” असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने विरोध केला असता, बिभीषण आणि अशोक पोले यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने तुषार तुकाराम शेंबडे याच्यावर कोयत्याने वार केला. त्यानंतर बिभीषणने केलेल्या कोयत्याच्या वाराने तुषारच्या उजव्या हाताचे एक बोट कापले गेले असून इतर तीन बोटे फॅक्चर झाली आहेत. तसेच अशोक पोले याने तुषारच्या पायावर आणि फिर्यादी बाळू पोले याच्या डोक्यात कोयत्याने मारून गंभीर जखमी केले.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पमाबाई पोले आणि कोमल पोले यांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. पाटोदा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११७(२), १९१(२) आणि ३५१(२) सह इतर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी तागड करत आहेत