Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

‘स्वाराती’ रुग्णालयाची कंपाऊंड वॉल पाडताना अडवले; सुरक्षा रक्षकाला मारहाण, गुन्हा दाखल

Updated: डिसेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

सुरक्षा रक्षकाला मारहाण, गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण (एसआरटीआर) शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीचे नुकसान करण्यापासून रोखल्याच्या रागातून एका सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) मध्ये कार्यरत असलेले अशोक लक्ष्मण बारगजे हे गुरुवारी दुपारी एसआरटीआर रुग्णालयात आपल्या कर्तव्यावर तैनात होते. रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूची सुरक्षा भिंत स्थानिक नागरिक पाडून येण्या-जाण्यासाठी वापरत असल्याने प्रशासनाने ती भिंत नुकतीच बांधून घेतली होती. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रुद्राक्ष नावाचा मुलगा या भिंतीच्या विटा काढताना बारगजे यांना दिसला. त्यांनी मुलाला हटकले असता त्याने त्यांच्याशी वाद घातला आणि तो तेथून निघून गेला.

थोड्याच वेळात तो मुलगा आपल्या वडिलांसोबत घटनास्थळी परतला. त्याचे वडील अविनाश नरसिंगे यांनी सुरक्षा रक्षक बारगजे यांना ‘माझ्या मुलाला का टोकले’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बारगजे यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या आरोपीने त्यांच्या युनिफॉर्मची कॉलर फाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि चापट्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला असून बारगजे यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

अंबाजोगाई शहर पोलिसांनी या प्रकरणी अविनाश नरसिंगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), १३२ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार मंगेश मारोती भोळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts