Breaking
Updated: मे 5, 2026
धनादेश न वटल्याप्रकरणी मुकादमाला १० लाखांचा दंड आणि एक वर्ष कारावास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाने धनादेश न वटल्याप्रकरणी (चेक बाऊन्स) आरोपी विलास श्रीमंत भोरे याला ५ मे २०२६ रोजी एक वर्ष सक्त मजुरी आणि १० लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याकडून घेतलेली उचल रक्कम वेळेत न परत केल्याने आणि दिलेला धनादेश बँकेत अनादरित झाल्याने न्यायालयाने हा निकाल दिला. या कायदेशीर लढाईत कारखान्याच्या वतीने ॲड. प्रवीण मेटे यांनी मांडलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास भोरे याने २००८-२००९ च्या गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कारखान्यासोबत करार करून ३ लाख ५० हजार रुपयांची उचल घेतली होती. मात्र, करारानुसार पूर्ण काम न केल्याने व्याजासह ४ लाख ९४ हजार रुपयांची थकबाकी निर्माण झाली. ही रक्कम फेडण्यासाठी आरोपीने २०१३ मध्ये दिलेला धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने परत आला. यानंतर कारखान्याने विधीज्ञ प्रवीण मेटे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावूनही आरोपीने दाद दिली नाही, त्यामुळे कारखान्याने न्यायालयात धाव घेतली.
प्रस्तुत प्रकरणात कारखान्याच्या वतीने लालासाहेब इंगळे व गोवर्धन पवार यांची साक्ष नोंदवण्यात आली. ॲड. प्रवीण मेटे यांनी प्रभावीपणे मांडलेली बाजू आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावासाची तरतूद केली आहे. या निर्णयामुळे आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना मोठा चपराक बसली आहे.