Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

स्व.नानांकडून राष्ट्रभक्ती, त्याग आणि सेवा याची प्रेरणा घ्यावी – डॉ.सुभाष जोशी

Updated: डिसेंबर 12, 2025

By Vivek Sindhu

स्व.नानांकडून राष्ट्रभक्ती, त्याग आणि सेवा याची प्रेरणा घ्यावी - डॉ.सुभाष जोशी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

स्व.नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक फिरता चषक खोलेश्वर महाविद्यालयास ; तर नागपूर येथील अनिकेत वनारे ठरला प्रथम विजेता

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
स्व.नानांनी राष्ट्रभक्ती, त्याग आणि सेवा शिकवली, याची आपण प्रेरणा घ्यावी असे आवाहन डॉ.सुभाष जोशी यांनी उद्घाटक म्हणून बोलताना केले. तर स्व.नाना पालकर यांनी समाज परिवर्तनाचे कार्य केले असे गौरवोद्गार बिपीन क्षीरसागर यांनी स्पर्धेच्या समारोप सत्रात काढले.‌ येथील खोलेश्वर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित स्व.नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा शानदार समारोप गुरूवारी झाला. या स्पर्धेत नागपूर येथील संताजी महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत रामा वनारे हा प्रथम विजेता ठरला. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक फिरता चषक खोलेश्वर महाविद्याल, अंबाजोगाई यांना मिळाला. सदरील स्पर्धेत राज्याच्या विविध जिल्ह्यांतून ५२ स्पर्धक सहभागी झाले होते.

खोलेश्वर महाविद्यालयात गुरूवार, दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित स्व.नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य तर उद्घाटक म्हणून डॉ.सुभाष जोशी (अध्यक्ष -पूर्णवादी नागरी सहकारी बँक, बीड.) हे होते तर व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जयप्रकाश तोष्णीवाल, प्रमुख अतिथी युवा नेते अक्षय मुंदडा, भा.शि.प्र.संस्थेचे मुख्य प्रशासकीय समन्वयक प्रा.चंद्रकांत मुळे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे, कार्यवाह किरण कोदरकर, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विष्णुपंत कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.दीपक फुलारी आदींची उपस्थिती होती. यावेळी उद्घाटक डॉ.सुभाष जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या स्पर्धेचा मी सुरूवातीला स्पर्धक होतो. आज उद्घाटक म्हणून मला बोलावून आपण जो सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. वक्ता निर्माण करणारी ही वक्तृत्व स्पर्धा आहे. स्पर्धकांनी अभ्यास करावा म्हणजे वक्तृत्व कसे असते हे सर्वांना समजेल स्व.नाना पालकरांसह अनेक चरित्र ग्रंथ विद्यार्थी स्पर्धकांनी अभ्यासावेत, कमी वेळेत अर्थपूर्ण बोलणे वक्तृत्व कलेचे वैशिष्ट्य आहे. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये खूप चांगले विषय आहेत. स्व.नानांनी राष्ट्रभक्ती, त्याग आणि सेवा शिकवली आहे. याची आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी असेही आवाहन डॉ.जोशी यांनी उपस्थितांना केले. तर प्रमुख अतिथी म्हणून बोलताना अक्षय मुंदडा म्हणाले की, स्पर्धा कोणत्याही क्षेत्रातील असो आयुष्यात वेळेचे व्यवस्थापन जमलं पाहिजे. मागील पन्नास वर्षांपासून ही स्पर्धा अविरत सुरू आहे. स्पर्धा सुरू करणे आणि टिकवणे हे अवघड आहे. खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय स्पर्धेत आत्मविश्वास आणि सामान्य ज्ञान वाढतं. तेव्हा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रभक्ती जोपासली पाहिजे व देशप्रेम जागे ठेवणे गरजेचे असल्याचे मुंदडा यांनी सांगितले. प्रास्ताविक करताना स्पर्धेचे संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक पुलारी यांनी स्व.नाना पालकर स्मृती अंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजना संदर्भात माहिती देताना सांगितले की, चारित्र्यसंपन्न, सामाजिक भान असलेली व राष्ट्रप्रेमी पिढी घडावी या उद्देशाने भा.शि‌.प्र.संस्थेची स्थापना झाली. अध्ययन व अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेतील शिक्षक सतत कार्यरत असतात. त्यांनी आलेल्या स्पर्धकांना स्व.नाना पालकरांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली तसेच स्पर्धेत निवडलेल्या विषयांबद्दलही माहिती सांगितली. तर उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी विचारांच्या आधारावर गेली ५५ वर्षे ही स्पर्धा आपण घेत आहोत. राष्ट्रीय विचारांवर ही संस्था स्थापन झाली आहे. राष्ट्र उभारून विकसित राष्ट्र वर्धिष्णू करायचा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी स्व.नाना पालकर यांचा, त्याग आणि समर्पण वृत्ती घेतली पाहिजे, नानांनी जे विचार दिले. ते प्रेरणादायी आहेत. राष्ट्र उभारणीसाठी नानांनी त्याग शिकविला आज समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणात होत आहे. आपली कुटुंब व्यवस्था सुदृढ असली पाहिजे यासाठी त्याग आणि समर्पण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एनसीसी कॅडेट अग्निविरांचे अभिनंदन व स्वागत पालकांच्या उपस्थित करण्यात आले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा.सतीश हिवरेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ.बिबीशन फड यांनी मानले. या स्पर्धेच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.संस्थाध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बिपिनदादा क्षीरसागर, शहर संचालक निवृत्ती दराडे, दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, केंद्रीय कार्यकारणी सदस्या डॉ.कल्पनाताई चौसाळकर, सौ.वर्षाताई मुंडे, विष्णू सोनवणे, नितीन चौधरी, खोलेश्वर सीबीएस स्कूल अध्यक्ष डॉ.गोपाळ चौसाळकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, विष्णुपंत कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.दीपक फुलारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बिपिनदादा क्षीरसागर यांनी सांगितले की, भा.शि.प्र.संस्था हा एक परिवार आहे. ५५ वर्षे सातत्याने चालणाऱ्या स्पर्धेचे कौतुक करून विद्यार्थ्यांत वक्तृत्व गुणाचा विकास व्हावा, प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रप्रेमी नागरिक घडविणारी ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. स्व.नाना हे समाज परिवर्तनाचे काम करीत होते. म्हणून मोठ्या व्यक्तीचे स्मरण करण्याची ही स्पर्धा आहे. स्व.नाना पालकर यांच्या चरित्राचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा असेही आवाहन क्षीरसागर यांनी केलं. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संचालक निवृत्ती दराडे, दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, ऍड.राजेश्वर देशमुख यांनी ही आपले समायोचित विचार मांडले. तर संस्थाध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, स्व.नाना पालकर यांनी आपलं आयुष्य चंदनाच्या खोडासारखं झिजवलं, अनेक पद्य ग्रंथ लिहिले अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.‌ वक्तृत्व ही एक कला आहे. तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे बोलता, त्या शब्दांना अर्थ मिळतो. वजन मिळते. ते फक्त वक्तृत्व कलेने. तेव्हा स्व.नाना यांचे देशप्रेम, त्याग, समर्पण भावना तसेच त्यांच्या उठावणी समाजाला दिशादर्शक असल्याचेही डॉ.आलूरकर यांनी सांगितले. यावेळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थी, परीक्षक सौ.तिलोत्तमा इंगोले आणि डॉ.नयनकुमार आचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. समारोप सत्राचे सुत्रसंचालन प्रा.दत्तप्रसाद गोस्वामी आणि प्रा.विनय राजगुरू यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ.तुळशीराम मुंडे यांनी व्यक्त केले. उद्घाटन व समारोप सत्रात वैयक्तिक पद्य प्रा.शैलेश पुराणिक यांनी सादर केले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून एकूण ५२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्व कौशल्याची उत्कृष्ट बाजू सादर केली. या वर्षी स्पर्धेसाठी वंद्य वंदे मातरम्, नागरिकांची कर्तव्ये व माझे वर्तन, हरित भारत – समृद्ध भारत, आधुनिक तंत्रज्ञान : विकसित भारत, आणि नारी घे भरारी असे एकूण पाच विषय देण्यात आले होते. सदर स्पर्धेत नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर आदी जिल्ह्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.दीपक फुलारी, स्पर्धाप्रमुख प्रा.योगेश कुलकर्णी, सहप्रमुख प्रा.तुळशीराम मुंढे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने झाली. थोडक्यात स्व.नाना पालकर स्मृती अंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५-२६ ने विद्यार्थ्यांच्या विचारांच्या क्षितिजांना नवी दिशा दिली. उगवत्या वक्त्यांनी सामाजिक भान, राष्ट्रभक्ती, पर्यावरण, विज्ञान-तंत्रज्ञान आणि स्त्रीशक्ती यावर प्रभावीपणे भाष्य केले. आयोजक संस्था, परीक्षकवृंद, मान्यवर आणि सर्व स्पर्धकांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.

स्व.नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे विजेते :
स्व.नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक फिरता चषक १) श्रेया अनिल ढोले आणि २) शिवकन्या नवनाथ शिंदे (खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, अंबाजोगाई) यांना मिळाला. तर वैयक्तिक प्रथम पारितोषिक अनिकेत रामा वनारे (संताजी महाविद्यालय, नागपूर) यांना स्व.सौ.भागीरथी वसंतराव देशमुख गाढे पिंपळगावकर यांच्या स्मरणार्थ ऍड.राजेश्वर देशमुख यांनी रोख रक्कम रूपये ७००१/- व सन्मानचिन्ह असे पारितोषिक दिले. द्वितीय पारितोषिक कु.अन्वि विकास जाधव (सेंट विराज कॉलेज फॉर गर्ल्स,जि.पुणे) यांना स्व.सुधाकर रामचंद्रराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ सौ.अपर्णाताई कुलकर्णी व सौ.डॉ.सीमा पांडे, नागपूर यांनी रोख रक्कम रूपये ५००१/- व सन्मानचिन्ह असे पारितोषिक दिले. तर तृतीय पारितोषिक चि.विशाल रमेश सोनुने (चन्ना बसवेश्वर फार्मसी कॉलेज, लातूर) यांना डॉ.अतुलदादा देशपांडे (अध्यक्ष, स्थानिक व्यवस्था मंडळ भा.शि.प्र.,अंबाजोगाई) यांनी रोख रक्कम रूपये ३००१/- व सन्मानचिन्ह असे पारितोषिक दिले. यावेळी दोन उत्तेजनार्थ रोख रक्कम ११०१/- रूपयांची पारितोषिके अनुक्रमे कु.मोहिनी चंद्रशेखर पायघन (सिध्देश्वर महाविद्यालय, माजलगाव) यांना स्व.निवृत्ती दशरथ अंकुश यांच्या स्मरणार्थ बालाजी निवृत्ती अंकुश यांनी दिले. आणि चि.रोहीत गौतम वाघमारे (खोलेश्वर वरिष्ठ महाविद्यालय, अंबाजोगाई) यांना स्व.नंदकुमार सेलूकर यांच्या स्मरणार्थ महेश सेलूकर यांनी दिले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून प्रा.डॉ.नयनकुमार आचार्य (वैद्यनाथ महाविद्यालय,परळी वै.), प्रा.दिलीप भिसे (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई) आणि सौ.तिलोत्तमा इंगोले (पतकराव) – योगेश्वरी नूतन विद्यालय, अंबाजोगाई यांनी काम पाहिले.


Categories

Recent Posts