Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

राजकिशोर मोदी, बबनराव लोमटे आणि संजय गंभिरे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी

Updated: जानेवारी 14, 2026

By Vivek Sindhu

Picsart 26 01 14 21 54 22 561 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

उपनगराध्यक्ष पदाबाबत सस्पेन्स कायम, गुरुवारी होणार निवड

अंबाजोगाई: अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेला बुधवारी (दि.14) सुरुवात झाली असून, लोकविकास महाआघाडीचे राजकिशोर मोदी व बबनराव लोमटे आणि शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे संजय गंभीरे यांची निवड आता निश्चित झाली आहे. या तिन्ही उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरले असून, गुरुवारी गटनेत्यांमार्फत त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. मात्र, स्वीकृत सदस्यांची नावे स्पष्ट झाली असली तरी उपनगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स अद्यापही कायम असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अंबाजोगाई नगर परिषदेत एकूण ३१ नगरसेवक असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शहराने संमिश्र कौल दिला होता. नगराध्यक्ष पदासाठी जनतेने नंदकिशोर मुंदडा यांना पसंती दिली, मात्र सभागृहात बहुमत राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकविकास महाआघाडीला मिळाले. मोदींच्या आघाडीकडे २० तर मुंदडांच्या आघाडीकडे ११ नगरसेवक आहेत. या संख्याबळानुसार स्वीकृत पदासाठी मोदी गटाला दोन आणि मुंदडा गटाला एक जागा मिळाली आहे. त्यानुसार बुधवारी मोदी गटाकडून राजकिशोर मोदी व बबनराव लोमटे आणि मुंदडा गटाकडून संजय गंभीरे यांचे अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे तिन्ही अर्ज वैध ठरवले आहेत. गुरुवारी शहर परिवर्तन आघाडीचे गटनेते नंदकिशोर मुंदडा आणि लोकविकास महाआघाडीचे गटनेते सय्यद ताहेर हे त्यांच्या स्वीकृत सदस्यांच्या अधिकृत निवडी जाहीर करतील.

उपनगराध्यक्ष पदाची उत्सुकता कायम

दुसरीकडे, उपनगराध्यक्ष पदासाठी दोन्ही आघाड्यांनी आपली रणनीती अत्यंत गोपनीय ठेवली आहे. जरी संख्याबळानुसार राजकिशोर मोदी यांच्या गटाचे पारडे जड दिसत असले, तरी राजकीय फोडाफोडीच्या शक्यतेने वातावरण तापले आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे बंडखोरी करणे सोपे नसले तरी, कायदेशीर पळवाटा शोधून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी सकाळी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर लगेचच सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्यानंतरच अंबाजोगाईचा नवा उपनगराध्यक्ष कोण हे स्पष्ट होईल.


Categories

Recent Posts