Breaking
Updated: जानेवारी 24, 2026
रेल्वे भुसंपादन, रखडलेले कामे वेळेत पुर्ण करा: खा.बजरंग सोनवणे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelरेल्वे अधिकाऱ्यांना सुचना: अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचा घेतला आढावा, अपूर्ण कामे, भूसंपादन व नागरिकांच्या अडचणींवर सखोल चर्चा
बीड : अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गांवरील बीडपासून पुढे रखडलेले रेल्वे मार्गाचे कामे, भुसंपादनाची २० प्रकरणे वेळेत पुर्ण करा, रेल्वे मार्गाशेजारील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा, अशा सुचना खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात मंगळवारी (दि.२४) बीड रेल्वे विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गासह विविध महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अहिल्यानगर रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता लोळगे, याच बरोबर विविध विभागाचे विभागप्रमूख उपस्थित होते. अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील विद्युत जोडणी, सिग्नल वर्क आणि बीड ते वडवणी तसेच वडवणी ते सिरसाळा व सिरसाळा ते परळी या टप्प्यांतील कामांची सद्यस्थितीबाबत सविस्तर आढावा घेतला. बीड ते परळी रेल्वेमार्गात २० ठिकाणची भुसंपादन प्रक्रिया सुरू आहे. सदरील प्रकिया तातडीने पुर्ण करा, या कामात हयगय करू नका, अशा सुचना देतानाच रेल्वेचे कंत्राटदार कामे करत नसतील तर त्यांना समज द्या, कामे वेळेत करून घेण्यासाठी प्रयत्न करा पण या वर्षात रेल्वे परळीपर्यंत हायस्पिड धावलीच पाहिजे, अशा सुचनाही यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. रेल्वे हा बीडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, शिवाय माझ्यासाठी हा विषय महत्वाचा आहे. यामुळे रेल्वेचे काम पुर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू ठेवा, असेही खा.सोनवणे म्हणाले.
मालधक्का तातडीने कार्यन्वीत करा
आष्टी तालुक्यात नियोजीत मालधक्का असून तो अद्याप प्रत्यक्षात सुरू झाला नाही. व्यपाारी, शेतकरी, उद्योजकांच्या दृष्टीने हा मालधक्का अत्यंत महत्वाचा आहे. तो तातडीने सुरू करावा, शिवाय बीड आणि परळीतही मालधक्के करावे लागणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढील कार्यवाही करावी, अशा सुचना देखील खा.सोनवणे यांनी दिल्या.
या महत्वाच्या मागण्यावर चर्चा
बीड-नगर-मुंबई व बीड-नगर-पुणे इंटरसिटी सेवा चालू करणे, बाशी नाका येथे अतिरिक्त रेल्वे थांबा देणे, बीडमधील पालवन व बाशी नाका स्थानकासाठी कार पार्किंग, सर्व प्रमुख स्थानकांना लागणारी वीज उपलब्ध करणे, सोलार ऊर्जा निर्मिती प्रकल्प तयार करणे, आष्टीतील काकडवाडी (पिंपळा) लगतच्या रेल्वे क्रॉसिंग पुलाकरिता वाढीव निधी देणे अशा विविध महत्वाच्या मागण्यावर चर्चा करण्यात आली.
अभियंत्याबद्दल नाराजी
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील शिरूर येथील रेल्वे पटरी खाली नाल्यावर तिरका पूल बांधल्यामुळे विकासनगर वस्तीवर जाण्या-येण्यासाठी असणारा दळणवळणाचा रस्ता बंद झाला आहे, असे म्हणत खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वेचे अभियंते असे कसे काम करत आहेत, अनेक ठिकाणी तिरके पुल बांधले, सरकारचा निधी विनाकारण खर्च केला असे म्हणत नाराजीही व्यक्त केली.
परळी, नवीन रेल्वे मार्गावर चर्चा
परळी-परभणी दुहेरीकरणासाठी होत असलेले जमीन अधिग्रहण व असलेली घरे रेल्वेसाठी संपादित न करता परळी थर्मल परिसरात मोकळी जागा शोधावी, असा पर्याय खा.सोनवणे यांनी शोधला, तर धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कामाच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा करू प्रकल्प फिजिबल होईल यासाठी प्रयत्न करावेत, असेही अधिकाऱ्यांना म्हटले.
बैठकीला शेतकऱ्यांचीही उपस्थिती
रेल्वे मार्गावरील हिवरसिंगा, मालकवाडी-रोकडेश्वरनगर, खोकसारवाडी, बरगावडी-घुगांवडी, शिरूर धुमाळ येथील रेल्वेच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तर काही ठिकाणी ज्या गावचे शेत रेल्वेत गेले त्या गावचे नाव रेल्वे स्थानकाला न देता दुसरेच दिले, अशा तक्रारी घेवून शेतकरी, नागरिक बैठकीत दाखल झाले होते.
रायमोहचा विषय पुन्हा सांगायला लावू नका
पाटोदा रस्ता ते रेल्वे स्टेशन रायमोहा पक्का रस्ता करणे आवश्यक आहे. यासाठी दोन वेळा आपल्याला सांगितले आहे. त्याठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे.पाटोदा रस्ता ते बाबासाहेब जाधव यांचे वस्तीकडे जाणारा रस्ता खोदकाम करून सोडलेला आहे. मदन जाधव हा विषय वारंवार मांडत असतात. त्याठिकाणी तातडीने काम करावे, हे काम पुन्हा सांगायला लावू नका, अशी तंबी देखील खा.बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिली.
ओव्हरब्रीजची शेतकऱ्यांची मागणी
आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी, कडा तसेच पाटोदा तालुक्यातील कारेगाव, शिरूर तालुक्यातील गोमळवाडा, विघनवाडी, हिवरसिंगा व बीड तालुक्यामध्ये नवगण राजुरी, चऱ्हाटा, धानोरा रोड या सर्व ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज बांधण्याची आवश्यकता आहे, अशा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. तसे निवेदने येतात, असे खा.सोनवणे म्हणाले.