Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

नात्यातील ओलावा आणि कर्तृत्वाचा सन्मान: उपजिल्हाधिकारी गणेश पवार यांचा पदोन्नतीबद्दल कोपले कुटुंबियांकडून भव्य सत्कार

Updated: डिसेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

उपजिल्हाधिकारी गणेश पवार यांचा पदोन्नतीबद्दल कोपले कुटुंबियांकडून भव्य सत्कार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेल्या नात्यातील वीण किती घट्ट असू शकते, याचा प्रत्यय अंबाजोगाईत नुकताच पाहायला मिळाला. महसूल प्रशासनात आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवणारे आणि सध्या उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नत झालेले गणेश पवार यांचा सत्कार सोहळा म्हणजे केवळ एक शासकीय कौतुक सोहळा न राहता, तो एका कुटुंबाचा आपल्या लाडक्या जावयासाठी केलेला जिव्हाळ्याचा सोहळा ठरला. कोपले कुटुंबियांच्या वतीने आयोजित या सोहळ्याने उपस्थितांना भावनिक केले.

शारदा कदम-पवार या कोपले कुटुंबाच्या मानसकन्या आहेत. त्यांचा जीवनप्रवास कमालीच्या संघर्षातून गेला असला तरी, कोपले कुटुंबियांनी त्यांना कधीही परकेपण जाणवू दिले नाही. आपल्या हक्काच्या मुलीप्रमाणे तिची पाठराखण केली. त्यामुळेच जेव्हा तिचे पती गणेश पवार यांची उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली, तेव्हा कोपले कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. गणेश पवार यांची प्रशासनात एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे. विशेषतः शेगाव येथील तहसीलदार म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे. जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. सध्या ते मंत्र्यांचे प्रशासकीय स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी आणि आपल्या लेकीचा संसार सुखाचा आणि प्रतिष्ठेचा होत असताना एका पित्याच्या भूमिकेतून विजयकुमार कोपले आणि संपूर्ण कोपले परिवाराने या भव्य सत्कार सोहळ्याचे नियोजन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता पाटील आणि प्रमुख अतिथी राजकिशोर मोदी यांनी शारदा कदम यांचा उल्लेख संघर्ष कन्या असा केला. अत्यंत कष्टातून तिने आपले विश्व निर्माण केले असून गणेश पवार यांच्यासारखा उत्कृष्ट जोडीदार तिला लाभला आहे, असे ते म्हणाले. शारदा कदम यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, संकटाच्या काळात कोपले कुटुंब माझ्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिले. त्यांच्याच पाठबळामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. तसेच माजी खासदार गंगाधर बुरांडे, दत्ता पाटील, राजकिशोर मोदी आणि शहाजी उमाप यांच्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तर सत्कारमूर्ती गणेश पवार यांनी देखील अत्यंत भावूक होत आपल्या सासरच्या मंडळींनी दिलेल्या प्रेमाचा स्वीकार केला. मराठवाड्यातील माणुसकी आणि कोपले कुटुंबियांचे जावयाप्रती असलेले हे अपार प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अंबाजोगाईच्या मातीत रुजलेले कोपले कुटुंब व्यवसायाने इथे आले असले तरी त्यांनी इथल्या लोकांशी रक्तापलीकडचे ऋणानुबंध जोडले आहेत. त्यासोबतच अंबाजोगाई शहराचे राजकारण, समाजकारण, व्यवसाय आणि बँकिंग क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. विजयकुमार कोपले यांच्यासह संपूर्ण कोपले कुटुंबाने नेहमीच कर्तृत्ववान माणसांची पाठराखण करण्याची अंबाजोगाईची परंपरा जपली आहे. याच परंपरेचा भाग म्हणून त्यांनी आपल्या मानसकन्येच्या पतीचा, म्हणजेच आपल्या जावयाचा नागरी सत्कार करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. हा कार्यक्रम एका मोठ्या एकत्रित कुटुंबाचा मेळावा असल्यासारखाच वाटत होता.

या सोहळ्याला प्रख्यात पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष एड. मकरंद पत्की, अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत गाठाळ, माजी उपनगराध्यक्षा सविता लोमटे, गौतमचंद सोलंकी, दाजीसाहेब लोमटे, प्रा. अशोक लोमटे, आनंद लोमटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कोपले कुटुंबाचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts