Breaking
Updated: June 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupगेवराई – येथील छत्रपती मल्टीस्टेटमध्ये मुदत ठेवीच्या रुपात ठेवलेली रक्कम मिळत नसल्याने एका ४६ वर्षीय व्यक्तीने शाखेच्या दारातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजता घडली. याप्रकरणी मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश आसाराम जाधय (वय 46, रा.खळेगाव ह.मु.गणेश नगर, गेवराई) असे आत्महत्या केलेल्या ठेवीदार व्यक्तीचे नाव आहे.
दिलेल्या फिर्यादीत कविता सुरेश जाधव (वय 35) यांनी म्हटले आहे की, मी व माझे पती सुरेश आत्माराम जाधव यांच्यासह राहत असुन शेतीचा व्यवसाय करून पोट भरते. मला एक मुलगी साक्षी (वय 21) व एक मुलगा शुभम (वय 18) असे दोन मुले असून ते दोघेही शिक्षण घेत आहेत. आम्ही आमच्या शेती व्यवसायाच्या बचतीतून मुलांच्या शिक्षणासाठी सन 2020 पासून एकुण 11 लाख 50 हजार मुदत ठेव हि छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेत ठेवलेले होते. मात्र मागील दोन वर्षांपासून आम्ही त्यांना वारंवार आमचे ठेव ठेवलेले पैसे परत द्या असे म्हणत होतो. परंतु ते आम्हाला पैसे परत देत नवहते. आम्हाला आज देतो, उद्या देतो असे म्हणून टाळाटाळ करीत होते. मागील सहा महीण्यापुर्वी माझे पती सुरेश जाधव यांनी ठेवीचे पैसे परत देत नसल्याने विषारी औषधाची बाँटल घेऊन जात शाखेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष उर्फ नाना बसंता भंडारी यांनी आम्हाला आमचे 2 लाख 50 हजार रुपये परत दिले होते. उर्वरीत 9 लाख रुपये पुढील दोन महिन्यानंतर देतो असे सांगितले होते. परंतु त्यांना आम्ही वारंवार छत्रपती मल्टीस्टेट शाखा गेवराई येथे जावुन देखील पैसे दिले नाही. त्यामुळे माझे पती सुरेश जाधव हे खूप तणावात राहत होते. दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने ते अधिकच खचून जात मल्टीस्टेटच्या त्रासाला कंटाळून गेले होते.
दि.१७ रोजी दिवसभर छत्रपती मल्टीस्टेट शाखा गेवराई येथे पैसे मागण्यासाठी आम्ही आमच्या दोन्ही मुलांसह गेलो होतो. परंतु शाखेच्या मॅनेजर ज्योती क्षीरसागर यांनी आम्हाला दिवसभर पैसे दिले नाही. तसेच माझे पती सुरेश जाधव यांना अर्वाच्च भाषेत बोलुन शाखेतून बाहेर काढून दिले. यानंतर माझे पती सुरेश जाधव यांना मी फोन करू. मुलांसोबत घरी थांबण्यास सांगितले होते. यानंतर त्यांनी दि.18 रोजी सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास छत्रपती मल्टीस्टेटच्या दारासमोरच गळफास लावून आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, चेअरमन संतोष भंडारी यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी काही वेळ पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी तात्काळ चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल केला.
आत्महत्या करण्यापूर्वी शाखा व्यवस्थापकांना मेसेज
माझ्या मुलांच्या शिक्षणाचे तुम्ही वाटोळे केल्याबद्दल धन्यवाद, एवढा अंत एखाद्याचा बघू नये, खरी परिस्थिती जाणून घ्यायला हवी होती. वेळोवेळी पैसे मागवून देखील तुम्ही पैसे देत नाहीत, म्हणून मी तुमच्यासमोर आत्महत्या करत आहे, याचा निरोप चेअरमन संतोष भंडारी व भंडारी दादा यांना द्या, असे आत्महत्या करण्यापूर्वी सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेटच्या शाखा व्यवस्थापक ज्योती क्षीरसागर यांना व्हाट्सएप मेसेज टाकून गळफास घेत जीवन संपवले.