Breaking
Updated: एप्रिल 14, 2026
वडिलांवर कोयत्याने वार करून चिमुकलीलाही फेकून दिले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका मुलाने पित्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची आणि घरातील सामानासह दुचाकींची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील लक्ष्मीआई तांडा येथे घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजु दगडु पवार (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मोठा मुलगा सचिन हा दारूच्या व्यसनाधीन आहे. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सचिन दारू पिऊन घरी आला आणि लहान भाऊ नितीनची दुचाकी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागला. वडिलांनी त्याला दारूच्या नशेत गाडी नेण्यास मज्जाव केला असता त्याने संतापून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने रागाच्या भरात नितीनची दुचाकी खाली पाडून दगडाने फोडली आणि वडिलांच्या दुचाकीचीही काठीने मोडतोड केली.
वडिलांनी विचारणा केली असता सचिनने थेट कोयत्याने त्यांच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. वाद सोडवण्यासाठी आलेल्या भावाचा त्याने चावा घेतला, तर सून श्रीदेवी हिला दगडाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. क्रूरतेचा कळस गाठत त्याने लहान मुलगी कोमल हिला देखील उचलून फेकून दिले आणि घरातील सोफा व इतर सामानाचे नुकसान केले. ‘तुला आज संध्याकाळपर्यंत संपवून टाकीन’ अशी धमकी देऊन तो पसार झाला. जखमी राजु पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शरद पवार करत आहेत.