Breaking
Updated: एप्रिल 15, 2026
अंबाजोगाईत ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा 'अन्न-पाणी त्याग' आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहरातील ‘दि मोमीनाबाद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी’च्या कारभारावर संताप व्यक्त करत एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आपल्या हक्काच्या माहितीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. किशोर जादवजी परमार असे या आंदोलकाचे नाव असून, त्यांनी येत्या १७ एप्रिल २०२६ पासून अन्न, पाणी आणि औषधांचा त्याग करून ‘आत्मक्लेश आंदोलन’ सुरू करण्याची अधिकृत नोटीस गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून किशोर परमार हे माहिती अधिकार अधिनियम २००५ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत आपल्या घरासंबंधीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि माहितीची मागणी करत आहेत. या संदर्भात त्यांनी वारंवार पत्रव्यवहार, दूरध्वनी आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला होता. सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), अंबाजोगाई यांनी सदर माहिती तातडीने देण्याचे आदेश देऊनही संस्थेचे अध्यक्ष ईश्वर ब्रिजलाल मुंदडा आणि सचिव बालाप्रसाद रामगोपाल बजाज यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप परमार यांनी केला आहे. कोणत्याही प्रकारचे लेखी किंवा तोंडी उत्तर न मिळाल्याने अखेर निराश होऊन त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार किशोर परमार हे हृदयविकार आणि मधुमेहाने ग्रस्त आहेत. नुकतीच त्यांच्या डोळ्यावर देखील शस्त्रक्रिया झालेली आहे. अशा नाजूक प्रकृतीत त्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. दत्तमंदिर समोरील गेटजवळ हे आंदोलन होणार असून, आंदोलनादरम्यान त्यांच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यास कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांचीच असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाची प्रत शहर पोलीस निरीक्षकांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.
कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील
“चार महिन्यापूर्वी नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येऊन आम्ही कार्यभार घेतला आहे. पूर्वीची अनेक कागदपत्रे उपलब्ध नाहीत, शोध घेऊन जेवढी उपलब्ध आहेत त्यापैकी परमार यांनी मागणी केल्यानुसार त्यांना ती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
– ईश्वर मुंदडा, अध्यक्ष