Breaking

मजुराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; ४ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास

Updated: एप्रिल 14, 2026

By Vivek Sindhu

४ लाखांची रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: मजुरी करून साठवलेली पुंजी आणि कष्टाचे सोने अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लंपास केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील हाडबेवाडी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायस धोंडिबा गायकवाड (वय ६० वर्ष, रा. हाडबेवाडी) हे आपल्या पत्नीसह मजुरी करून उदरनिर्वाह करतात. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते परळी येथे आपल्या मुलीकडे गेले होते. दोन दिवस तिथे मुक्काम केल्यानंतर १३ एप्रिल रोजी सकाळी त्यांना गावातील एका तरुणाचा फोन आला की त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले आहे. गायकवाड दाम्पत्य तातडीने गावी परतले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

चोरट्यांनी धान्याच्या कोठीत लपवून ठेवलेले १ लाख ९० हजार रुपये, गादीखालील १ लाख ४० हजार रुपये आणि बचत गटाचे ५० हजार रुपये अशी एकूण ३ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याशिवाय ७ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १३ ग्रॅमचे सोन्याचे ‘सेवनपीस’ आणि १ ग्रॅमची सोन्या-मोत्याची मणी माळ असा अंदाजे ४२ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवजही लंपास केला आहे. एकूण ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार सायस गायकवाड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बर्दापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts