Breaking

गेवराई पोलिसांची मोठी कारवाई: आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Updated: मार्च 5, 2026

By Vivek Sindhu

आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवत आंतरजिल्हा दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १७ संपूर्ण मोटारसायकली, १६ सांगाडे आणि ३० इंजिन असा एकूण २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार आणि त्यांच्या विशेष पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

गेल्या दोन महिन्यांपासून गेवराई शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि संशयितांवर पाळत ठेवली होती. ५ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी अचूक सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील गॅरेज चालक सय्यद अब्रार सय्यद जैनुद्दीन (३१), बीड येथील सय्यद इमदाद हुसैन (२२) आणि नेकनूर येथील भंगार विक्रेता शेख आसेम शेख मझर (३२) यांचा समावेश आहे. यातील एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, ही टोळी दुचाकी चोरल्यानंतर नेकनूर येथील शेख आसेम याच्याकडे सुपूर्द करत असे. शेख आसेम हा अवघ्या दोन तासांत गाडीचे सर्व सुटे भाग करून तिची विल्हेवाट लावत असे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील चोरीच्या गाड्यांचा असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या कारवाईमुळे राज्यातील अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची चिन्हे आहेत.