Breaking
Updated: जून 10, 2026
वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड जिल्ह्यात 29.50 लक्ष रोपे तयार, ‘एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम
बीड – राष्ट्रीय वन धोरण 1988 च्या उद्दिष्टानुसार राज्याचे वनाच्छादन आणि वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यात 300 कोटी वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यामध्ये आगामी 2026 च्या पावसाळ्यासाठी प्रशासनाने विभागनिहाय वृक्ष लागवडीचे विशेष उद्दिष्ट निश्चित केले असून, संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात वर्ष 2026 च्या पावसाळ्यातील वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रभुदय मुळे, विभागीय वन अधिकारी एस.एम. लखमावाड, प्रादेशिक अधिकारी ए.डी.गरकल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, वर्ष 2026 ते 2047 या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवड अभियाना दरम्यान परिणाम आधारित अंमलबजावणी आराखड्याचा अवलंब करणार आहे, ज्यामध्ये वृक्ष 10 वर्षापर्यंत जतन व संवर्धनाची तरतूद असणार आहे. जेणेकरून लागवड केलेल्या वृक्षांचे दीर्घकालीन अस्तित्त्व आणि वाढ सुनिश्चित होण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील वृक्षारोपण कार्यक्रमात केवळ शासकीय यंत्रणाच नव्हे, तर पर्यावरण स्नेही स्वयंसेवी संस्था यांनाही मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यात यावे. सर्वच विभागांना नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच शालेय स्तरावर एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करावी. अशा सूचनाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केल्या.
वर्ष 2026 ते 2047 या दीर्घकालीन कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शासनाने हरित महाराष्ट्र आयोग या विशेष उद्देशीय स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणेची स्थापना केली आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या जिल्हा पातळीवरील प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नियमित देखरेखीसाठी विशेष सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा स्वतः जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी यांच्याकडे या समितीचे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेसाठी सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर रोपनिर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाकडे 20 लक्ष तर प्रादेशिक वनविभागाकडे 9.50 लक्ष अशी एकूण 29.50 लक्ष रोपे सध्या उपलब्ध असल्याची माहिती उपवनसंरक्षक श्री. बिराजदार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे बैठकीत दिली.