Breaking
Updated: जून 8, 2026
बांधावरील माती काढल्याच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला, दोघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: तालुक्यातील बोरगाव येथे शेताच्या सामाईक बांधावरील माती ट्रॅक्टरने काढल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या शेत सर्वे नंबर ६३ मध्ये घडली. या प्रकरणी महादेव सुबराव गव्हाणे (वय ४०, रा. बोरगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बळीराम शंकर गव्हाणे आणि संतोष बळीराम गव्हाणे या दोघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महादेव गव्हाणे हे आपल्या शेतात असताना आरोपी बळीराम याने सामाईक बांधाची माती ट्रॅक्टरने का काढली, अशी विचारणा करत शिवीगाळ केली आणि गचांडी पकडून चापटबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याच वेळी आरोपी संतोष गव्हाणे याने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने महादेव यांच्या डाव्या दंडावर, मनगटावर आणि पोटरीवर मारून गंभीर जखमी केले. तसेच ‘पुन्हा शेतात ट्रॅक्टर घेऊन आलास तर जिवंत सोडणार नाही’ अशी जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर केज पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार मुरकुटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ग्रामीण भागातील बांधाचे वाद पुन्हा एकदा हिंसक वळण घेत असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.