Breaking
Updated: जून 10, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: तालुक्यातील भगवान पुरुषोत्तमपुरी या पवित्र तीर्थक्षेत्री बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. पुरुषोत्तम देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गोदावरी नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर घेऊन जात असताना प्रवाशांनी खच्चून भरलेली बोट अचानक नदीपात्रात उलटली. या दुर्दैवी अपघातात दोन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, एक ७५ वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. पवित्र अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची स्थानिक बोट चालकांकडून पैशांच्या हव्यासापोटी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जात होती. बोट नदीच्या मध्यभागात पोहोचली असता वजनाचा तोल बिघडल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोट उलटल्याचे पाहताच किनाऱ्यावरील स्थानिक मच्छीमार आणि तरुणांनी तातडीने नदीत उड्या घेऊन अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, प्रनिला शेषराव राठोड (वय ५५, रा. लोणार, जि. बुलढाणा) आणि अन्य एक अज्ञात महिला भाविक यांचा नाकातोंडात पाणी गेल्याने जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत सिंधुबाई अर्जुन मावळे (वय ७५, रा. महागाव, जि. वाशिम) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर माजलगाव येथील खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. अधिक मासाच्या सुरुवातीला १९ मे रोजी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, तसेच दोन दिवसांपूर्वीही एक बोट उलटली होती. सलग दुर्घटना घडूनही जिल्हा प्रशासन, पोलीस आणि मंदिर समितीने बोटींमध्ये जीवरक्षक जॅकेट (Life Jackets) वापरणे किंवा मर्यादित प्रवासी संख्या ठेवणे यासारखे सुरक्षेचे कोणतेही कडक नियम लागू केले नाहीत. प्रशासनाच्या याच अक्षम्य हलगर्जीपणामुळे निष्पाप भाविकांना आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.