Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सख्ख्या ९ वर्षीय चुलत भावाचा गळा आवळून खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप

Updated: जानेवारी 15, 2026

By Vivek Sindhu

सख्ख्या ९ वर्षीय चुलत भावाचा गळा आवळून खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; परळी तालुक्यात घडली होती घटना

अंबाजोगाई : अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप चुलत भावाचा गळा आवळून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. शेतातील पाईप लाईन आणि किरकोळ वादातून ही क्रूर घटना १५ डिसेंबर २०१८ रोजी परळी तालुक्यातील चांदपूर येथे घडली होती. या गाजलेल्या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बाळासाहेब माणिकराव लोमटे यांनी मांडलेला भक्कम युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे आरोपीला गजाआड करण्यात निर्णायक ठरले.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मयत अनिकेत गित्ते आणि आरोपी अतुल गित्ते यांचे कुटुंब एकाच गावात वास्तव्यास असून त्यांची शेती शेजारी-शेजारी आहे. शेतातील पाणी देण्याची पाईप लाईन सामायिक असल्याने त्यांच्यात वारंवार खटके उडत असत. याच वादाचे रूपांतर हिंसेत होऊन आरोपींनी कट रचून अनिकेतचा सुती दोरीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चिमुरड्याचा मृतदेह घरातील पाण्याच्या हौदात उभा करून ठेवण्यात आला होता. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र सादर केल्यानंतर हे प्रकरण अंबाजोगाई सत्र न्यायालयात चालले.

जिल्हा व सत्र न्यायाधीश रचना रमेशसिंह तेहरा यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बाळासाहेब लोमटे यांनी १२ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, इतर साक्षीदार आणि डॉक्टर यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने मुख्य आरोपी अतुल गित्ते याला भादंवि कलम ३०२ आणि २०१ अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याबद्दल रवी वैजनाथ गिते (वय २४), वैजनाथ रंगनाथ गिते (वय ५०) आणि आशाबाई वैजनाथ गिते (वय ४५) या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

या संवेदनशील प्रकरणात सरकारी अभियोक्ता बाळासाहेब लोमटे यांना ॲड. शिवाजी व्यंकटराव मुंडे यांनी सहकार्य केले, तर कोर्ट पैरवीचे काम म.पो.ह. मंगल मंचकराव दोनगहू यांनी चोख बजावले. गुन्ह्याच्या तपासात पोलीस उपनिरीक्षक डी.आर. वाघमारे आणि परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक एम.ए. सय्यद यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.


Categories

Recent Posts