Breaking
Updated: जून 19, 2026
जातेगाव येथे बंद घर फोडून अज्ञात चोरांनी लांबवला ऐवज
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: तालुक्यातील जातेगाव येथे एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. आजीच्या अंत्यविधीसाठी कुटुंब मूळ गावी गेले असता, अज्ञात चोरांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. ही घटना १६ जून रोजी सकाळी ६ ते १७ जून रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली असून, या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जातेगाव येथील रहिवासी राहुल रोहीदास राठोड यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे ते आपल्या पत्नीसह मूळ गावी मारफळा तांडा येथे गेले होते. अंत्यविधी आटोपून १७ जून रोजी दुपारी एक वाजता ते जातेगाव येथील घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचे मुख्य दार उघडे दिसले. आत जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि लोखंडी कपाट उघडे होते. चोरांनी कपाटातील मौल्यवान सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी राहुल राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून तलवाडा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार काकडे या चोरीचा पुढील तपास करत आहेत.