Breaking
Updated: June 27, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड – जिल्हयातील सर्व नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 मधील तरतुदीनुसार दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. याबाबत वेळोवेळी मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 नुसार दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट सक्तीचे आहे, असे निर्णय दिलेले आहेत.
जिल्ह्यात सन 2024 मध्ये रस्ता अपघातामधील मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वार यांचे झालेले आहेत. यामध्ये 60 % पेक्षा जास्त अपघात मृत्यू हेल्मेट परिधान न करता गाडी चालविल्यामुळे झालेले दिसून येत आहेत. जिल्ह्याच्या विकासात प्रशासनाची भूमिका महत्वाची आहे. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी हे प्रशासनाचा कणा समजण्यात येतात. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे वर्तन समाजासाठी नेहमीच अनुकरणीय असे आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात येताना, सार्वजनिक रस्त्यावर वावरताना हेल्मेट परिधान केल्यास सर्व नागरिकांमध्ये हेल्मेट परिधान करण्याबाबत जनजागृती होते. त्यामुळे वाहनधारक स्वयंप्रेरणेने हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त होतात. जिल्हयातील सर्व शासकीय आस्थापना, महामंडळे, महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद येथील अधिकारी, कर्मचारी यांनी दुचाकी वाहनाने शासकीय कार्यालयात येताना, रस्त्यावर दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहेत.