Breaking
Updated: डिसेंबर 22, 2025
कौटुंबिक त्रासातून साडूच्या मुलाचा केला गळा आवळून खून
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकौटुंबिक त्रासातून साडूच्या मुलाचा केला गळा आवळून खून
अंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. बीड स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन दिवसांत या खुनाचा छडा लावून मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी जवळगाव येथील गायरान शेतात स्वप्निल ऊर्फ चिंगू अशोक ओव्हाळ (३०, रा. चक्रे गल्ली, रेणापूर) याचा मृतदेह पालथ्या स्थितीत आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात स्वप्निलचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बर्दापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी मुख्य आरोपी गोरोबा मधूकर डावरे (४५, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) याच्यासह त्याचे साथीदार संतोष लिंबाजी मांदळे (३४, रा. इंडियानगर, लातूर), किशोर गोरोबा सोनवणे (२९, रा. बसवेश्वर चौक, लातूर) आणि अमोल विनायक चव्हाण (२६, रा. एस. टी. क्वार्टर, लातूर) यांना २० डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. मृत स्वप्निल हा मुख्य आरोपी गोरोबा याचा नातेवाईक होता. स्वप्निल हा सतत दारू पिऊन पत्नीला आणि गोरोबा यांना त्रास देत असे, तसेच त्याने वादात गोरोबाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. याच रागातून गोरोबाने त्याला रेणापूर येथून जवळगावला आणले आणि गळा आवळून त्याची हत्या केली.
सदर प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर कांबळे, सुशांत सुतळे, मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने, सचिन आंढळे, विकी सुरवसे, अतुल हराळे, शरद कदम आणि कडुबा म्हेत्रे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली