Breaking
Updated: जानेवारी 13, 2026
आमदार नमिता मुंदडांचे प्रयत्न यशस्वी; ५ कामांना मिळाला हिरवा कंदील
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआमदार नमिता मुंदडांचे प्रयत्न यशस्वी; ५ कामांना मिळाला हिरवा कंदील
अंबाजोगाई: शहरातील अल्पसंख्याक बहुल भागातील नागरी सुविधांसाठी ५० लक्ष रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून, केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या निधीतून शहरातील विविध दर्गा, मस्जिद आणि कब्रस्थान परिसरात संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक आणि इतर मूलभूत सोयींची कामे केली जाणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजनेतंर्गत ही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी आ. नमिता मुंदडा यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. अंबाजोगाई शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या वतीने विविध विकासकामांची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. नागरिकांच्या या गरजा ओळखून आ. मुंदडा यांनी या कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला आहे.
या शासन निर्णयानुसार, अंबाजोगाई शहरासाठी एकूण ५० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने पाच मोठ्या कामांचा समावेश आहे. अंबाजोगाई शहरातील मौलाली दर्गा परिसरात १० लाख रुपये खर्च करून संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. तसेच आशिकुल्ला दर्गा परिसरात १० लाख रुपये खर्चाचे बेड तयार करण्याचे काम केले जाईल. कुरेशी कब्रस्थान येथे १० लाख रुपये खर्चून बेड तयार करणे, मंगळवार पेठेतील महमदिया मस्जिद परिसरात १० लाख रुपये खर्चाचे बाथरुम बांधकाम करणे आणि फ्लॉवर्स क्वार्टर येथील कासिम अली मस्जिद परिसरात १० लाख रुपये खर्चून बेड व पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांना मंजुरी मिळाली आहे.
याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. आ. मुंदडा यांच्या या विशेष प्रयत्नांमुळे शहराच्या अल्पसंख्याक बहुल भागातील रस्ते, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मतदारसंघातील विकासकामांबाबत असलेल्या त्यांच्या सातत्यपूर्ण भूमिकेचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे.