अंबाजोगाई(प्रतिनिधी)-क्षेत्र कोणतेही असो वक्तृत्व कला अंगी जर असेल तर हसत खेळत आयुष्य जगण्यासाठी उपयुक्तता वाढते, त्यातुन सकारात्मकता साध्य होते. आयुष्याच्या व्यवस्थापनात देखील वेळेचे नियोजन महत्वाचे असते. हे सांगताना भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा परिवार नेहमीच मुंदडा कुटुंबियांच्या राजकिय जडणघडणीचा भाग राहिला असुन ही संस्था म्हणजे माझ्यासाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी केले. खोलेश्वर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराज्यीय स्व.नाना पालकर वक्तृत्व स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. सुभाष जोशी, कार्यवाह हेमंत वैद्य, जिल्हा संघचालक जयप्रकाश तोष्णीवाल, चंद्रकांत मुळे, डॉ.अतुल देशपांडे, किरण कोदरकर, राम कुलकर्णी, विष्णुपंत कुलकर्णी, प्राचार्य डॉ.दीपक फुलारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात बोलताना अक्षय मुंदडांनी मागच्या पंचावन्न वर्षापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे कौतुक करताना वर्तमान स्थितीत व्याख्यानमालेकडे दुर्लक्षित झाले असताना संस्था स्पर्धेचे सातत्य टिकवुन ठेवते हे संस्कार खर्या अर्थाने नियोजनाचा आणि संस्काराचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात भारतीय शिक्षण प्रसारक संस्था हीच खर्या अर्थाने एक चांगला नागरिक घडवणारी संस्था म्हणुन ओळखल्या जाते. मुंदडा कुटुंबाचं संस्थेसोबत पारिवारिक नातं असुन आमच्या एकुण राजकिय जडणघडणीत संस्था परिवाराचा मिळालेला आशिर्वाद कधीच विसरू शकत नाही. आमच्यासाठी हक्काचं व्यासपीठ ज्यामुळे सुचना मिळाल्याबरोबर आम्ही उपस्थित रहातो. त्याच ऋणानुबंधातुन आ.नमिता मुंदडा यांनी स्वत: पुढाकार घेत जिल्हा नियोजन विकास निधीतुन महाविद्यालय मैदान दुरूस्तीसाठी सात लाख रूपये मिळवुन दिल्याचे त्यांनी जाहिर केले. शालेय तथा महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुला-मुलींनी वेगवेगळ्या स्पर्धेत सतत सहभाग घेतला तर आत्मविश्वास वाढतो. शिवाय व्यक्तिमत्व घडवण्यासाठी संधी प्राप्त होते. ज्यांना विचाराची मांडणी आणि आयुष्य कसं सुटसुटीत जगावं? या गोष्टी स्पर्धेतुन मिळणार्या विषयातुनच पुढे येतात असं मुंदडा म्हणाले. राज्यभरातुन आलेल्या स्पर्धकासाठी अनेक वर्षापासुन जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकाराने व्यवस्था उभा रहाते. तो केवळ संस्था परिवाराशी असलेल्या अतुट नात्याचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. अक्षय मुंदडा यांनी आपल्या भाषणात स्व.प्रमोद महाजन, स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी काढत उजाळा देण्याचा प्रयत्न करताना परिवार आणि मुंदडा कुटुंब हा सगळा ऋणानुबंध सांगितला. स्पर्धकांना प्रेरणा देताना त्यांनी सांगितले की, कुठल्याही स्पर्धेत भाग घेतल्यानंतर यश-अपयश याची वजाबाकी करण्यापेक्षा चिकाटीने तुम्ही घेतलेला सहभाग हेच खरं 100 टक्के यश असतं ज्यामुळे आपलं आयुष्य घडून जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन प्रा.डॉ.सतिश हिवरेकर यांनी केले.