Breaking
Updated: मे 12, 2026
उधारीवर बियर न दिल्याने बीडमध्ये सराईत गुंडाचा गोळीबार; गोळी लागून बियर शॉपीमालक जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: बीड शहरात उधारीवर बियर देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका सराईत गुंडाने बियर शॉपी मालकावर पिस्तुल रोखून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या गोळीबारात शॉपीचे मालक जखमी झाले असून, आरोपी गुन्हेगार पिस्तुलसह घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना रोडवरील लक्ष्मीनगर भागात राहणारे सौरभ सुधाकर राउत (वय २५) हे समर्थ बियर शॉपी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास राउत हे आपली शॉपी बंद करण्याच्या तयारीत असताना, माळीवेस येथील रहिवासी आशिष शामराव आठवले हा तिथे आला. त्याने उधारीवर बियरची मागणी केली असता, राउत यांनी त्यास नकार दिला. याचा राग धरून आरोपीने राउत यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुकानातील बियरची बाटली बळजबरीने ओढून घेतली.
राउत यांनी या कृत्याला विरोध केला असता, आरोपी आशिषने आपल्या कमरेला लावलेली पिस्तुल काढून त्यांच्या दिशेने रोखली आणि ‘तुला गोळ्या घालीन’ असे ओरडत दहशत निर्माण केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी राउत यांनी आरोपीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी आरोपीने पिस्तुलमधून गोळी झाडली. ही गोळी राउत यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला चाटून गेल्याने ते जखमी झाले. आरडाओरड झाल्यानंतर आरोपी आपली स्कुटी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.
या गंभीर गुन्ह्याची नोंद बीड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ३५२, ३५१(२) आणि शस्त्र अधिनियमाच्या कलम ३, २५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबा राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.