Breaking
Updated: मे 11, 2026
परळीमध्ये ग्लोबल विकास ट्रस्टच्या मोफत अन्नछत्र सेवेचा शुभारंभ
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) – समाजातील गरजू, शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या पोटाची भूक भागवण्याचा मानवतेचा वसा घेत जलनायक मयंक गांधी यांच्या संकल्पनेतून ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने परळी वैजनाथ येथे “मोफत अन्नछत्र” सेवेचा सोमवारी, दि. ११ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरालगत, संकटमोचन हनुमान मंदिरासमोर सुरू करण्यात आलेली ही सेवा अनेक गरजूंना आधार देणारी ठरणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर 01 मे रोजी सिरसाळा येथे यापूर्वीच अन्नछत्र सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून तेथे दररोज 90 ते 100 गरजूंना लाभ होत आहे.
परळीसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची या भागात दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा कष्टकरी बांधवांना किमान एक वेळच्या अन्नाची चिंता भासू नये, त्यांच्या पोटाला अन्न मिळावे आणि माणुसकीची ऊब अनुभवायला मिळावी, या उदात्त हेतूने गुरुजींच्या आशीर्वादातून परळी वैजनाथ आणि सिरसाळा येथे ही मोफत अन्नछत्र सेवा सुरू करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना जलनायक मयंक गांधी यांनी सांगितले की, “अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. समाजातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये, हीच आमची भूमिका आहे. मानवतेच्या भावनेतून सुरू केलेली ही सेवा समाजातील माणुसकी अधिक दृढ करेल.”
या उद्घाटन सोहळ्यास डॉ. हरिश्चंद्र वंगे, बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, विविध व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माऊली फड, श्रीराम मुंडे, पाटलोबा मुंडे, नंदलाल बियाणी, पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, माजी नायब तहसीलदार बी.एल. रुपनर, बाजार समितीचे सचिव बलवीर रामदासी यांच्यासह व्यापारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्लोबल विकास ट्रस्टच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण झाला असून, “भुकेल्याला अन्न” या संकल्पनेतून माणुसकीचा खरा धर्म जपला जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.