Breaking
Updated: मे 12, 2026
बीड नगरपालिकेत राडा; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घुसून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व जिवे मारण्याची धमकी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश दिगंबरराव खडसे यांच्या दालनात घुसून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालमत्ता कराबाबत असलेल्या तक्रारीवरून दोन जणांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत मुख्याधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेतील फिर्यादी शैलेश खडसे हे बीड नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ७ मे २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ते आपल्या दालनात कार्यालयीन कामकाज पाहत होते. यावेळी आरोपी शेख निजाम आणि त्याचा मुलगा हे दोघे मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात आले. आपल्या मालमत्तेबाबत चुकीचा पीटीआय जनरेट झाला असल्याचे सांगून त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांना नोकरीतून काढून टाका, अशी मागणी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
गोंधळ वाढत गेल्यानंतर आरोपींनी तेथे उपस्थित असलेले शिपाई विष्णू चांदणे आणि अब्दुल वहाब यांना धक्काबुक्की करून बाजूला लोटले. इतकेच नाही तर आरोपींनी मुख्याधिकाऱ्यांना उद्देशून ‘बाहेर ये, तुला बघतो’ अशी धमकी देऊन कार्यालयातील खुर्ची उचलून आपटली. शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या अनपेक्षित प्रकारामुळे काही काळ पालिकेत तणावाचे वातावरण होते.
याप्रकरणी ११ मे रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १३२, २२१, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत करत आहेत.