Breaking

अंबाजोगाई पीपल्स बँकेला मिळाला सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा उपक्रम पुरस्कार

Updated: मे 12, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई पीपल्स बँकेला मिळाला सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा उपक्रम पुरस्कार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जलद व अत्याधुनिक सेवा देवून अंबाजोगाई पीपल्स बँकेने ग्राहकांची विश्वासार्हता कमावली – चेअरमन राजकिशोर मोदी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंबाजोगाई या बँकेला क्रेस्ट इन्फो मिडिया यांच्या वतीने पुणे येथे आयोजित ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकींग सम्मीट ऍण्ड अवॉर्ड – २०२६ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा उपक्रम पुरस्काराने नुकतेच गौरवविण्यात आले आहे. अंबाजोगाई पीपल्स बँकेने नेहमीच पारदर्शक, गतिमान कारभार व तत्पर ग्राहक सेवेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण उत्तम टीमवर्क करून बँकेने जलद व अत्याधुनिक सेवा देवून सभासद, ठेविदार, ग्राहक आणि हितचिंतक यांची विश्वासार्हता कमावली असे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी सांगितले.

यंदा चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेस मिळालेला पुरस्कार हा बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व शाखाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या उत्तम टीम वर्कचेच फलित आहे. सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना एखाद्या बँकेने केंद्र सरकार, आरबीआय, सहकार खाते आणि बँकींगचे सर्व नियम पाळून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत बँकींग सेवा, विविध सुविधा उपलब्ध करून देते. अंबाजोगाई पीपल्स या आपल्या बँकेने ही आपला एनपीए हा कमीत-कमी राखण्याचा, ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न प्रत्येक आर्थिक वर्षांत केलेला आहे. अंबाजोगाई पीपल्स बँकेने एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केले याची दखल घेत आशिया खंडातील सहकारी बँकिंगसाठी सर्वात मोठे व्यासपीठ असलेले भारत कॉपरेटीव्ह बँकिंग समितीच्या वतीने मागील वर्षी मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात भारतरत्न सहकारिता पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंबाजोगाई या बँकेला क्रेस्ट इन्फो मिडिया यांच्या वतीने पुणे येथे आयोजित ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकींग सम्मीट ऍण्ड अवॉर्ड – २०२६ या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा उपक्रम पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार क्रेस्ट इन्फो मिडिया यांच्या वतीने आयोजित एका विशेष समारंभात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे, बँकेचे सरव्यवस्थापक गणेश अष्टपुत्रे, बँकेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य संदेश बोराडे, संगणक विभागप्रमुख गणेश रोकडे यांनी स्विकारला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह असे आहे. यावेळी क्रेस्ट इन्फो मिडिया यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत इंडस्ट्री प्रेझेंटेशन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम व पुरस्कार सोहळा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती. सध्याचे बँकिंग व्यवहार, डिजिटलायझेशन, सायबर क्राईमची जोखीम, काय सतर्कता बाळगावी, नवनवे तंत्रज्ञान, बँकींगसाठी आवश्यक आधुनिक सॉफ्टवेअर, मशिन्स, ऍप, नव्या सुविधा, उत्तम व दर्जेदार गुणवत्तापूर्ण ग्राहक सेवा देण्यासाठी आवश्यक बाबी या संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळेच्या कोरेगाव पार्क येथील वेस्ट इन परिसरात विविध स्टॉल उभारण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा उपक्रम हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंबाजोगाई या आपल्या बँकेने सुरूवातीपासून एनपीए कमीत-कमी राखला आहे. सर्वच शाखांतून बँकींग विषयक सर्व आधुनिक सेवा, सुविधा, नवे तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहार बँक सभासद आणि ग्राहकांना पुरविते. यापूर्वी ही बँकेस विविध सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकेने मिळविलेले आजचे हे यश दिवंगत लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, दिवंगत लोकनेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दिवंगत लोकनेते माजी आमदार बाबुरावजी आडसकर तसेच माजी कृषिमंत्री आमदार धनंजयजी मुंडे, माजी आमदार अमरसिंहजी पंडित यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मोलाची मदत व सहकार्य लाभल्यामुळे प्राप्त झाले आहे. या सोबतच बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, ठेवीदार, कर्जदार, भागधारक, ग्राहक, हितचिंतक तसेच सभासदांच्या सातत्यपूर्ण विश्वास व सहकार्याच्या भावनेमुळेच शक्य झाले असल्याचे देखील या पत्रकात नमूद केले आहे. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेची एकूण सभासद संख्या १३,१५८ एवढी असून त्याच्या बळावरच बँकेच्या सभासद तथा ग्राहकांना रू. ३६९ कोटी इतके कर्जवाटप केले आहे. या आर्थिक वर्षाचे रू.२१ कोटी एवढे भाग भांडवल असून बँकेचा स्वनिधी रू.५४ कोटी एवढा आहे. त्याच बरोबर वर्ष अखेरीस बँकेने एकूण रू.३५० कोटी एवढी गुंतवणूक केली आहे. बँकेने एकूण ठेवी रू.६६५ कोटी इतक्या जमा केलेल्या आहेत. सर्व ठेवींना विमा संरक्षण आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १३० कोटी रूपयांची व्यवसायात वाढ झाली आहे. स्थापनेपासून बँकेने लेखा परिक्षण वर्ग-अ कायम राखला आहे. तर अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेने मार्च २०२६ अखेर तब्बल १ हजार ३२ कोटींचा एकूण बँकिंग व्यवसाय केला असून शुन्य टक्के नेट एनपीए राखण्यात बँकेस यश आले आहे. तर बँकेने ५ कोटी २६ लक्ष रूपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. १९९६ साली केवळ एका शाखेद्वारे अतिशय अल्प अशा भांडवलावर सुरू झालेली अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक आज ६६५ कोटी ठेवींच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांत २१ कार्यरत शाखा व २ विस्तारित कक्ष अशा एकूण २३ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर व दर्जेदार बँकिंग सेवा देत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या केज, मुरूड व निलंगा या ठिकाणी बँकेच्या नवीन तीन शाखा अहवाल वर्षात कार्यरत झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांच्या आधीन राहूनच अंबाजोगाई पिपल्स बँक आजपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार करीत आहे. म्हणूनच रिझर्व्ह बँकेने नवीन शाखा सुरू करण्यास परवानगी दिल्याचे मोदी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या सर्वांगिण प्रगती आणि विकासात बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, सर्व संचालक श्री.वसंतराव चव्हाण, ऍड.विष्णुपंत सोळंके, पुरूषोत्तम चोकडा, सुरेश मोदी, ऍड.सुधाकर कराड, संकेत मोदी, शेख दगडू शेख दावल, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, हर्षवर्धन वडमारे, श्रीमती वनमाला रेड्डी, सौ.स्नेहा हिवरेकर, तज्ज्ञ संचालक सुनिल राजपुरोहित, तज्ज्ञ संचालक सचिन बेंबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे, बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेविदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक, बँकेचे सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारीवृंद व पिग्मी एजंट यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व योगदान आहे. अशी माहिती चेअरमन मोदी यांनी दिली. अंबाजोगाई पीपल्स बँकेस पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वस्तरांतून बँकेचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

जलद व अत्याधुनिक सेवा देवून अंबाजोगाई पीपल्स बँकेने विश्वासार्हता कमावली :
जलद व अत्याधुनिक सेवा देवून अंबाजोगाई पीपल्स बँकेने आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. म्हणूनच बँक सातत्यपूर्ण सर्वंकष कामगिरी करून वेगाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेविदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक यांच्या बॅंकींग गरजा पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. अंबाजोगाई पीपल्स ही ग्राहकांची आपली हक्काची व त्यांचे हित जपणारी ही बँक असून बँकेस सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा उपक्रम पुरस्कार – २०२६ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याने आंनद झाला. पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. यापुढील काळात ही अंबाजोगाई पीपल्स बँक आपल्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर राहील अशी ग्वाही देतो.

=====================


Categories

Recent Posts