Breaking
Updated: ऑगस्ट 8, 2025
बालविवाह प्रतिबंधासाठी १५ ऑगस्टला ग्रामसभा विशेष उपक्रम राबविण्याची मागणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelयुवाग्राम विकास मंडळाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट
केज – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची युवा ग्राम विकास मंडळाच्या अॅक्सेस टू जस्टिस प्रकल्पच्या टीमने भेट घेऊन बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या बालविवाहाच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तर या अनुषंगाने येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभा आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये बालविवाह प्रतिबंधासाठी विशेष उपक्रम राबविण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे सर्व ग्रामसभांमध्ये बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात यावी. ग्राम बाल संरक्षण समित्यांची जबाबदारी, कार्ये आणि कर्तव्ये ग्रामसभेमध्ये स्पष्टपणे वाचून दाखवावी. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये १५ ऑगस्ट रोजी बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात यावी. प्रत्येक ग्रामसभेमध्ये “”बालविवाहमुक्त गाव””असा ठराव मंजूर करून अंमलबजावणीसाठी नियोजन करण्यात यावे. सर्व मंगल कार्यालयांनी विवाह नोंदणीपूर्वी वर-वधूचे वय तपासून आवश्यक कागदपत्रे रेकॉर्डमध्ये ठेवणे बंधनकारक करावे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दर सोमवारी बालविवाह प्रतिबंध शपथ घेतली जावी. सर्व ग्रामपंचायत अधिकारी ॲक्शन मोडमध्ये काम करून बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. गट विकास अधिकाऱ्यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडून यामध्ये विशेष प्रयत्न करावेत. तालुकास्तरावर पुजारी/देवबाप्पांची बैठक घेऊन वधू-वरांचे वय पडताळणीबाबत स्पष्ट निर्देश दिले जावेत. रेल्वे स्थानक, बस स्थानक व गर्दीच्या ठिकाणी बालकामगारविरोधी जनजागृती मोहिमा राबवाव्यात. तालुकास्तरीय बाल संरक्षण समित्या सक्रिय करून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी कार्यवाही सुनिश्चित करावी. अशी मागणी युवा ग्राम विकास मंडळाच्या प्रतिनिधींनी जिल्ह्याच्या बालहक्क रक्षणासाठी शासनाची साथ मिळावी व सामाजिक जनजागृती घडावी असा उद्देश मांडला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.